पुणे । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुलखात दोनवेळा रद्द झाल्यानंतर या मुलाखतीला पुन्हा एकदा 21 फेब्रुवारीचा मुहूर्त लाभला आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी 5 वाजता ही जाहीर मुलाखत होणार असल्याचे जागतिक मराठी अकादमी अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदे मध्ये सांगितले.
कोरेगाव भिमा घटनेमुळे नियोजीत कार्यक्रम पुढे ढकलला
पुण्यामध्ये जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित शोध मराठी मनाचा हे 15 वे जागतिक संमेलन 1 ते 3 जानेवारी दरम्यान पार पडले या कार्यक्रमात सुरवातीला 3 जानेवारीला ही मुलाखत होणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र काही कारणामुळे 6 जानेवारीला मुलाखतीची तारीख ठरवण्यात आली. दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडली आणि हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
रामदास फुटाणे यांनी जुळवला योग
या मुलाखतीसाठी मुलाखतकार म्हणून कोण असावे यावर मोठा खल झाला आणि अखेर राज ठाकरे यांचे नाव समोर आले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी हा योग जुळवून आणण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही या मुलाखतीसाठी पुढाकार घेतला होता. मात्र तारीख जाहीर झाल्यानंतरही प्रत्यक्ष मुलाखतीचा योग जुळून आला नव्हता.
50 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीचा आढावा
आता अखेर या लक्षवेधी मुलाखतीसाठी 21 फेब्रुवारीचा मुहूर्त सापडला आहे. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 50 वर्ष आणि शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या निमित्ताने शरद पवारांची आगळी वेगळी मुलाखत घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. मुक्त संवाद…. दोन पिढ्यांचा या विशेष संकल्पनेवर आधारित माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची ही मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत. यातून पन्नास वर्षांचा राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडला जाणारा आहे. या मुलाखतीव्दारे रसिकांना एका मनमोकळ्या आणि महाराष्ट्राची स्थिंतत्यरे सांगणार्या महत्त्वपूर्ण अशा संवादाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार
यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच कला-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील योगदान देणा-या मराठी व्यक्तींचा यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे. हा मुलाखत आणि पुरस्कार वितरण सोहळा सर्वांसाठी विनामूल्य खुला असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक सचिन ईटकर यांनी यावेळी केले.