जळगाव । जळगाव शहरासह अनेक जिल्ह्यांमधून शंभरापेक्षा जास्त मोटारसायकली चोरणारा सराईत मोटारसायकल चोरटा अमोल बेलप्पा आखाडे उर्फ अर्जुनकुमार बेलप्पा वाणी (वय-32, रा.वालसांगवी ता. भोकरदन, हमु.नशिराबाद) याच्या पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बुधवारी कोर्ट चौकात सापळा रचून मुसक्या आवळल्या. संशयिताकडून चार मास्टर चावीहस मोटारसायकल विक्रीसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्र मिळून आले असून ते पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, जळगाव शहरातील सहा ते सात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची त्याने कबूली दिली आहे.
अधिकार्याला साजेसा वावर
अमोल बेलप्पा आखाडे हा एका अधिकार्याप्रमाणे टिपटाप राहत असल्यामुळे कुणालाही तो सराईत मोटारसायकल चोरटा असल्याचे संशय सुध्दा येत नव्हता. त्याने अशा प्रकारे जळगावशहरासह बुलढाणा, नाशिक या जिल्ह्यांमधून 100 पेक्षा मोटारसायकली चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे सुध्दा दाखल आहेत. त्यामुळे अनेक पोलिस ठाण्याचे पोलिस त्याच्या मागावर होते. जळगाव शहरातून देखील सहा ते सात मोटारसायकली चोरीच्या घटना घडल्या असल्यामुळे संशयिताचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी शहर पोलिस ठाण्याचे विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, जिल्हापेठचे भास्कर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे विजय पाटील, नरेंद्र वारूळे, दिनेश बडगुजर तसेच जयंत चौधरी अशांचे विशेष तथक तपासाठी नेमले. यानंतर पथकाला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शहरातील मोटारसायकली चोरीच्या मागे अमोल बेलप्पा आखाडे याचा हात असल्याचे निषन्न झाले. त्यामुळे पथक त्याच्या मागावर होते. बुधवारी पथकाला अमोल हा कोर्ट चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून अमाल याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलिस ठाण्यात नेल्यानंतर त्याने मोटारसायकल चोरीची कबूली पोलिसांना दिली आहे. रामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वयाच्या 17 व्या वर्षापासून चोरीला सुरूवात
अमोल याने वयाच्या सतराव्या वर्षापासून चोरी करण्यास सुरूवात केली. त्याने अगोदर शहरासह गावातील सायकली चोरी करून त्या कमी किंमतीत किंवा भंगारात विक्री करायचा. यानंतर त्याने लुना तसेच लहान मोटारसायकल चोरीला सुरूवात केली. त्यानंतर महागड्या मोटारसायकली चोरी करू लागला.
फेसबुकवर एसबीआय कर्मचारी म्हणून अकाऊंट
अमोल याने फेसबुक वर एसबीआय बँकेंचा अधिकारी म्हणून अकाऊंट तयार केले आहे. त्यावर मोटारसायकल विक्रीची पावतीचा नमुना अर्ज देखील त्याने ठेवलेला. एक बँक अधिकारी दाखवून समोरच्या व्यक्तीला मोटारसायकल ओढून आणलेली असे भासवून त्यास कमी किंमतीत विकून फक्त साधी पावती देवून तो चोरी केलेली मोटारसायकल विकायचा.अशा प्रकारे अनेकांना गंडविले.
अनेक गुन्हे दाखल
जळगाव जिल्हासह नाशिक, धुळे, बुलढाणा, अकोला, जालना, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील मोटारसायकलीची गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून अमोल याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याजवळून चार मास्टर चाव्या मिळून आल्या आहेत. तर मोटारसायकली विक्रीसाठी लागणारे कागपत्र देखील मिळून आले आहेत. त्याची उच्च राहणीमान आणि एकाच ठिकाणी न थांबता वेगवेगळ्या ठिकाणी तो थांबत असल्यामुळे पोलिसांची हाती लागत नव्हता. अखेर बुधवारी जळगाव पोलिसांच्या हाती तो लागला आहे. त्यामुळे त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शिक्षाही भोगली
मोटारसायकली चोरीच्या शंभर दाखल गुन्ह्यांपैकी अमोल याने 12 गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगली आहे. नुकतीच त्याने नाशिक येथे दिड वर्ष तर बुलढाणा येथे अडीच वर्ष शिक्षा भोगून आला आहे. मात्र, त्यानंतर तो फरार झाला होता.
घरातून काढले बाहेर
अमोल हा नेहमी सायकलीा, मोटारसायकली चोरी करत असल्यामुळे त्याचे कुटूंबिय हैराण झाले होते. त्यात त्याच्या नेहमीच्या तक्रारी येत असल्यामुळे त्याला कुटूंबियांनी घराच्या बाहेर काढले होते. त्यामुळे अमोल हा अनेक वर्षांपासून एकटाच राहत असल्यामुळे त्याने आणखी मोटारसायकली चोरी करून गुन्हेगारीकडे वळला.
भंगार बाजारात विकायचा मोटारसायकली
एखाद्या ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केल्यानंतर तो एखाद्या व्यक्तीला बँकेचा फायनान्स कर्मचारी दाखवून मोटारसायकल विक्री करायचा. जर चोरीच्या मोटारसायकलीसाठी एखादा ग्राहक जर नाही मिळाला तर अमोल ती मोटारसायकल चक्क भंगारबाजारात जावून तिची पाच हजार रूपयांचा विक्री करायचा. अशा प्रकारे त्याने अनेक मोटारसायकली भंगार बाजारात विकल्याचे चौकशीत निष्पन झाले आहे. यासोबतच जळगावच्या भंगार बाजारातही त्याने चोरीच्या मोटारसायकलींची विल्हेवाट लावण्याचे चौकशीत समोर आले आहे.