अखेर सुरू झाला जिल्हा परिषद जवळचा रस्ता !

जळगाव प्रतिनिधी दि.१३ :- शिवाजीनगरला जोडणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असतांना आजपासून जिल्हा परिषदेजवळून जाणारा रस्ता खुला करण्यात आला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मध्यंतरी पुलाच्या कामाची पाहणी करून याला गती देण्याचे निर्देश देतांनाच विजेचे खांब स्थलांतरीत करण्यासाठीचा निधी उपलब्ध करून दिल्याने आजपासून हा रस्ता मोकळा झाला आहे. तर लवकरच या पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.*

 

मुख्य शहर आणि शिवाजीनगरसह पलीकडच्या भागातील जनतेसाठी अतिशय महत्वाच्या असणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येची दखल घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या समवेत मध्यंतरी २० डिसेंबर रोजी पुलाची पाहणी करून याच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यापूर्वी ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत सा.बा. विभाग, महापालिका व संबंधितांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. दरम्यान, येथील विजेचे खांब शिफ्ट करण्यासाठी निधीची अडचण आली असता ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद केल्याने विजेचे खांब स्थलांतरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला. या पार्श्‍वभूमिवर, रविवारी सायंकाळी ७.०० वाजेपासून पुलाच्या कामासाठी बंद करण्यात आलेला जिल्हा परिषदेच्या जवळील रस्ता हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे या भागातून ये-जा करणारे पादचारी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता येथून जाणार्‍यांचा फेरा वाचणार आहे.

 

दरम्यान, आता रेल्वे उड्डाण पुलाचे काम देखील अंतीम टप्प्यात आले असून काही दिवसांमध्ये हा पुल रहदारीसाठी खुला होण्याची शक्यता असून यामुळे आजवर त्रास झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.