मुंबई – राज्यातल्या शेतकऱ्यांची काळजी असेल तर शिवसेनेने अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरू करावे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केली.
शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. ते सोडवणे त्यांना जमत नसेल तर त्यांनी अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि मग आंदोलने करावीत. विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडून केली जाणारी टाळाटाळ आणि तूर खरेदीबाबत फसलेले व्यवस्थापन यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका आपल्याला बसू नये म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाची घोषणा केली आहे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला भारतीय जनता पार्टीइतकीच शिवसेनाही जबाबदार आहे. सत्तेत आल्यावर सातबारा कोरा करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले होते. शिवसेना सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली, तरीही राज्यातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का केला नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे चव्हाण यांनी सांगितले.
राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तूर खरेदी केंद्रे बंद आहेत. तूर खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांची तूर अवकाळी पावसाने भिजली आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट परदेश दौऱ्यावर गेले आहेत तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सरकार विरोधात मोर्चे काढत आहेत. सरकार विरोधात मंत्री आंदोलन करत आहेत. अशी दुर्देवी परिस्थिती या राज्याच्या इतिहासात कधी आली नव्हती. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांची एव्हढीच काळजी असेल तर या पक्षाच्या मंत्र्यांनी अगोदर मंत्रीपदाचे राजीनामे द्यावेत आणि मग संपर्क अभियान राबवावे. आम्ही त्यांचे स्वागत करू, असे ते म्हणाले.