मुंबई । मुंबईच्या कमला मिल्स कॉम्प्लेक्समधील दुर्घटनेनंतर 20 जानेवारी रोजी राजेंद्र पाटील या अग्निशमन दलाच्या अधिकार्यासह तिघांना अटक झाली. या कारणावरून फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशनने सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी सांगितले. कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा बळी गेला. याप्रकरणी अटक झालेल्यांमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी पाटील हे आहेत.
अधिकार्यांना बळीचा बकरा केल्याचा आरोप
याबाबत असोसिएशनने संताप व्यक्त केला असून यंत्रणेमध्ये त्रूटी असताना त्या सुधारण्यात आलेल्या नाहीत. चुकीच्या गोष्टी दुरुस्त केल्या जात नाहीत. मात्र, यात विभाग अधिकार्याला बळीचा बकरा बनवला असल्याचे प्रकाश देवीदास यांनी सांगितले. याबाबत आयुक्तांकडे चर्चेसाठी वेळ मागितली. मात्र, त्यांनी दिली नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी अधिकार्यांसोबत बैठक बोलावण्यात आली असून त्यानंतर राजीनामा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. अग्निशमन अधिकारी, सहायक अग्निशमन अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी आणि इतर विविध पदांवर असलेले सर्व अधिकारी सामूहिक राजीनामा देतील, असेही त्यांनी सांगितले.