अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0

बालासोर/नवी दिल्ली : अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नि-5 या आंतरमहाद्वीपीय स्वानातीत क्षेपणास्त्राची भारताने सोमवारी ओदिशा समुद्र किनार्‍यावरील अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी केली. पाच हजार ते साडेपाच हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची ही शेवटची चाचणी होती. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आता चीन, पाकिस्तान, युरोपसह अर्धे जग आले आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र संरक्षणात भारताने आपला जागतिक धाक निर्माण केला आहे. संपूर्णतः स्वदेशी बनावटीच्या या आंतरद्वीपीय क्षेपणास्त्राची ही चौथी चाचणी होती. एक टनापेक्षाअधिक वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असून, या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीन आल्यामुळे भारताचा राजनैतिक दबदबा वाढला आहे. युरोपपर्यंतचे कोणतेही शहर भारत लक्ष्य करून शकणार असल्याने भारताच्या संरक्षण सिद्धतेत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अवघ्या पाच मिनिटांत 5000 किलामीटरपर्यंत या क्षेपणास्त्राव्दारे हल्ला करता येणार आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीनने भारताच्या अगोदरच इतक्या क्षमतेचे क्षेपणास्त्र तयार केले आहे. इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल (खउइच2) बनविणारा भारत पाचवा देश ठरला आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन
संरक्षण दलाच्या सूत्राने सांगितले, की या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर आता अग्नि-5 हे क्षेपणास्त्र स्पेशल फोर्सेस कमांड (एसएफसी)मध्ये सहभागी केले जाणार आहे. डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)च्या शास्त्रज्ञांनी हे क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची सकाळी 11 वाजता यशस्वी चाचणी पार पडली. 17 मीटर लांब आणि 50 टन वजनाच्या या क्षेपणास्त्राने सर्व खडतर चाचण्या यशस्वी केल्यात. यापूर्वी 19 एप्रिल 2012, 15 सप्टेंबर 2013 आणि 31 जानेवारी 2015 रोजी तिसरी चाचणी झाली होती. या चाचण्यांत क्षेपणास्त्राच्या विविध टप्प्यांचे परीक्षण करण्यात आले होते.

दारूगोळ्यातील धातूचे सिलिंडर वापरले
सोमवारी झालेली अंतिम चाचणी होती. अग्नि क्षेपणास्त्र प्रणालीतील हे एक अत्यंत शक्तिशाली आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहेे. लक्ष्याचा अचूक माग काढणारे, आणि अत्यंत अचूक लक्ष्यवेध करणारे उपकरणे त्यात बसविण्यात आलेली आहेत. ओदिशा किनार्‍यालगत व्हीलर बेटावरून इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या प्रक्षेपण इमारत क्रमांक चारमधील एका मोबाईल लाँचरवरून या तीनस्तरीय भरीव प्रॉपेलंट क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. अग्नि-5 चे प्रक्षेपण ही लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ही चौथी विकासात्मक चाचणी, तर दारूगोळ्यातील धातूचे सिलिंडर वापरून घेतलेली ही दुसरी चाचणी आहे, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

अग्नि-5 क्षेपणास्त्राची ठळक वैशिष्ट्ये
* आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडातील कोणतेही लक्ष्य अचूक भेदू शकणार.
* 5000 किलोमीटर मारा करण्याची क्षमता, 17 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 50 टन वजन.
* एक टनापेक्षाअधिक अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता.
* अग्नि-5च्या चाचणीनंतर भारताचा सुपर एक्स्न्लुजिव्ह क्लबसह आयसीबीएममध्ये समावेश. या क्लबमध्ये सध्या रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनचा समावेश.
* दिशादर्शन यंत्रणेसह इतर सर्वच अत्याधुनिक उपकरणे, तंत्रज्ञानाने युक्त असे हे क्षेपणास्त्र आहे.