एरंडोल । एरंडोल-कासोदा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारी वाहने अचानक रस्त्यावर आलेल्या अजगराच्या पिल्लाला वाचविण्यासाठी सुमारे पंधरा मिनिटे थांबून पिल्लाला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिल्याची घटना कासोदा रस्त्यावर घडली. अजगराच्या पिल्लूचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी वाहन चालकांनी एकच गर्दी याठिकाणी केली होती. एरंडोल-कासोदा रस्त्यावर वाहनाची संख्या मर्यादितच आहे. रस्त्यावरून वाहने ये जा करीत असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास अंजनी प्रकल्पाच्या जवळ भर उन्हात अचानक दोन्ही बाजूकडील वाहन चालकांनी आपापली वाहने थांबविली कारण देखील तसेच होते.अंजनी प्रकल्पाच्या जवळ असलेल्या रस्त्यावरून अजगराचे पिल्लू रस्ता ओलांडत होते. उष्णतेमुळे रस्ता अत्यंत तापलेला होता. अजगराचे पिल्लू तापलेल्या रस्त्यावरून जाताना स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते.
वाहन चालकांनी समय सूचकता दाखवून वाहने थांबविली नसती तर कदाचित अजगराचे पिल्लू वाहनाखाली सापडून मरण पावले असते. मात्र चालकांनी वाहने थांबवून एका अजगराच्या पिल्लूस जिवदान दिले.वाहने थांबल्यामुळे सुमारे 15 मिनिटे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी वाहनांमध्ये असलेल्या नागरिकांनी अजगराचे पिल्लू पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. अनेकांनी अजगराच्या पिल्लूची हालचाल आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करून फोटो काढले. लहान मुलांनी प्रत्यक्ष अजगरास जवळून पाहिले.अजगराच्या पिल्लाने कोणते तरी भक्ष्य खाल्लेले असल्यामुळे त्याची गती अत्यंत धीमी होती. सुमारे दहा ते पंधरा मिनिटांनी अजगराचे पिल्लू रस्त्यावरून काटेरी झुडुपातून जवळच असलेल्या शेतात निघून गेले. पिवळ्या रंगाच्या अजगराच्या पिल्लूला प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान वाहन चालक व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या चेहर्यावर दिसत होते. अंजनी प्रकल्पामुळे या परिसरात अजगर व त्याच्या पिल्लांचा रहीवास असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. वाहन चालकांच्या दक्षतेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अजगरास जीवदान मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. अजगराचे पिल्लू रस्त्यावरून गेल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली व सर्व जण आपापल्या कार्याकडे रवाना झाले.