‘अजान’च्या ट्विटवरून सुचित्राला बलात्काराची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा

0

मुंबई : गायिका-अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीला ट्विटरवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्यासह शिवराळ ट्वीट करणाऱ्या चौघांवर ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुचित्राने काही दिवसांपूर्वी लाऊडस्पीकरवर अजान ऐकावे लागत असल्यामुळे सकाळ-सकाळी शांततेचा भंग होत असल्याचे ट्विट केले होते. मी जेव्हा सकाळी 4.45 वाजता घरी आले.. त्यावेळी अजानचा सर्वाधिक आक्रमक आणि कर्णकर्कश आवाज माझ्या कानी पडतो, असे हे ट्विट होते. भारतातल्या अजानचा आवाज हा मुस्लिम राष्ट्रांमध्ये होणाऱ्या अजानपेक्षाही मोठा आहे, असेही तिने पुढे म्हटल्याने सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात होते. बॉलीवूडमधील अनेक जण तिच्या समर्थनार्थ पुढे आले होते. रेणुका शहाणे हिने सुचित्राला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला होता. ओशिवारा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतानाचे छायाचित्र ट्विट करून तिने मुंबई पोलिसांना धन्यवाद दिले होते.

काही महिन्यांपूर्वी पार्श्वगायक सोनू निगमनेही, मी मुस्लिम नाही, तरी अजानच्या भोंग्यामुळे माझी झोपमोड का? असा सवाल करत, वाद ओढवून घेतला होता. या ट्विटनंतर सोनू निगमविरोधात पुण्यात याचिका दाखल करण्यात आली होती. एका मौलवीने तर सोनूची टक्कल करणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दुसरीकडे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी सोनूची पाठराखण करताना ‘नमाजसाठी अजान महत्त्वाची आहे; पण आजच्या आधुनिक युगात लाऊडस्पीकर गरजेचे नाही,’ असे मत व्यक्त केले होते. सामाजिक कार्यकर्ते बाबूभाई यांनीही, “इस्लाममध्ये दर्गा किंवा मशिदीवरील लाऊडस्पीकरला कोणतेही स्थान नाही. कुराण ए शरीफच्या आयतनुसार, खऱ्या मनाने केवळ तोंडी अजानच मान्य आहे,” अशा शब्दात सोनूचे समर्थन केले होते.

ही आहेत कलमे
509
महिलेच्या सन्मानाला धक्का पोहचवणाऱ्या भाषेचा वापर
67 अ
लैंगिकतेशी संबंधित कृत्य असलेलं साहित्य प्रकाशित करण्याची शिक्षा