पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचा उपक्रम
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीमध्ये ‘अजितदादा चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, शहर प्रवक्ते फझल शेख, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, संदिप लाला चिंचवडे, विद्यार्थी सेल शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे, राष्ट्रवादी क्रिडा सेल शहराध्यक्ष फिरोज शेख, मंगेश बजबळकर, प्रतिक साळुंके, विनायक काळभोर, महेश किवळे, योगेश मोरे, कल्पेश हर्णे आदी उपस्थित होते.
16 ते 22 जुलै दरम्यान होणार स्पर्धा
महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या मान्यतेने पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम येथे 16 जुलै ते 22 जुलै पर्यंन्त राज्यातील एकूण 20 नामांकित हॉकी संघांमध्ये बाद पध्दतीने या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप, मध्य रेल्वे, क्रिडा प्रबोधिनी, रेल्वे पोलीस, एसआरपीएफ, अस्पात केडमी, पीसीएम्सी इलेव्हन, हॉकी युनायटेड, हॉकी लव्हर्स, किडस् इलेव्हन, चिखलवाडी यंग बॉईज, आयकर विभाग पुणे, पुणे शहर पोलिस, रक्षक स्पोर्टस् क्लब, प्रियदर्शनी खडकी, जीएसटी अॅण्ड कस्टम्स संघ, सातारा इलेव्हन या नामांकित संघाचा खेळ पिंपरी-चिंचवड मधील क्रिडा शौकिनांना पहायला मिळणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अंतिम विजेत्या संघाला 22 जुलै रोजी पंचवीस हजारांचे पारितोषिक, अजितदादा चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, गोलरक्षक, बचावपटू, मधल्या फळीतील खेळाडू, आघाडीपटू, सामन्याचा मानकरी यांनाही पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.