राज्यमंत्री दिलीप कांबळेंचा टोला ; खान्देशातील लोकप्रतिनिधी पक्षातच ; आत्मपरीक्षण करणार
भुसावळ (गणेश वाघ)- पाच राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजपाचा सपाटून झालेल्या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत चैतन्य संचारले असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाचे अनेक आमदार, खासदार व ज्येष्ठ नेते आमच्या संपर्कात असल्याचे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर बहिणाबाई महोत्सवाला उपस्थित असलेल्या सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांना छेडले असता त्यांनी अजित पवारांना पडलेले हे दिवास्वप्न असून त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांनी आणखी मोठी स्वप्ने पहावीत, असा टोला कांबळे यांनी लगावला. विकासकामे करूनही पक्षाची झालेली पिछेवाट पाहता आत्मचिंतन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले तर माजी महसूलमंत्री यांना मिळालेल्या क्लीनचिटविषयी त्यांना छेडल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर मी बोलणे योग्य राहणार नसल्याचे सांगून विषय टाळला.
विकासकामे केल्यानंतरही बसला फटका
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसल्याने या विषयी राज्यमंत्र्यांना छेडले असता ते म्हणाले की, सलग 15 वर्ष या राज्यात भाजपाची सत्ता राहिली, मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली मात्र मतदारांनी विरोधकांच्या पारड्यात मत टाकले, अॅन्टीइन्कमबन्सीचा फटका भाजपाला बसल्याचे त्यांनी कबुल केले. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत भाजपाला याचा फटका बसणार काय? याबाबत विचारले असता त्यांनी तसे काहीही होणार नसल्याचे सांगत पुन्हा भाजपाचीच लाट येईल, असा दावा करीत पराभवाबाबतीत मात्र आम्ही आत्मचिंतन करणार असल्याचे सांगितले.
खान्देशातून कुणीही जाणार नाही काँग्रेसमध्ये
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाचे अनेक आमदार, खासदार व ज्येष्ठ नेते भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत राज्यमंत्री म्हणाले की, हे पवारांना पडलेले स्वप्न आहे, अशी स्वप्ने त्यांनी जरूर पहावीत, त्यांना त्यासाठी शुभेच्छा असल्याचा टोला त्यांनी लगावत खान्देशात व अन्य ठिकाणावरून कुणीही भाजपा सोडणार नसल्याचे ठासून सांगितले.
खडसे पक्षाचे ज्येष्ठ नेते ; त्यांना बोलण्याचा अधिकार
ज्येष्ठ असलेल्या माजी मंत्री खडसेंना पक्ष डावलत असून लालकृष्ण अडवाणींच्या रांगेत बसवत आहे शिवाय अनेक आरोपानंतरही पक्षाने त्यांना क्लीनचीट दिलेली नाही याबाबत राज्यमंत्र्यांना विचारणा केली असता त्यांनी खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांना निश्चित बोलण्याचा अधिकार आहे व त्यांनी पक्षाकडे नाराजीदेखील मांडली असल्याचे कांबळे यांनी सांगितले मात्र त्यांना पक्षाकडून क्लीनचीट का मिळाली नाही? याबाबत बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे सांगून त्यांनी कानावर हात ठेवत मुख्यमंत्र्यांकडे याबाबतचा चेंडू अप्रत्यक्षपणे टोलवला.