अजित पवारांनी घेतली आझम पानसरेंची भेट

0

राजकीय हेतू नसून केवळ तब्येतीबाबत विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचे स्पष्टीकरण

शहरात राजकीय चर्चेला उधाण

पिंपरी- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी महापौर आझमभाई पानसरे यांची बुधवारी सकाळी भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील ही मोठी घडामोड मानली जात आहे. पानसरे यांची तब्यतेची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. परंतु, राजकीय चर्चेला मात्र उधान आले आहे. अजित पवार यांनी बुधवारी सकाळी पानसरे यांच्या निगडी, प्राधिकरणातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, नाना काटे, पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे उपस्थित होते.

पानसरे भाजपात नाराज?
आझम पानसरे शहरातील ताकदवान नेते आहेत. ते अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पक्षाचे सलग दोनवेळा शहराध्यक्षपद देखील त्यांनी भुषविले आहे. परंतु, 2017 च्या महापालिका निवडणुकीवेळी पानसरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले होते. परंतु, भाजपमध्ये जाऊन दोन वर्षाहून अधिक काळ लोटला. तरी त्यांना कोणतेही पद देण्यात आले नाही. त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे पानसरे नाराज असल्याची चर्चा आहे.

भेटीला विशेष महत्त्व
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे मावळातून निवडणूक लढविण्याची चर्चा आहे. त्यापार्श्‍वभूमीवर झालेल्या पवार-पानसरे भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. शहराच्या राजकारणात त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पानसरे आजारी असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंरतु, या भेटीमुळे राजकीय चर्चेला मात्र उधान आले आहे.