अधिकमासानिमित्त हरीनाम सप्ताहाचे आयोजन
नवी सांगवी : पिंपरी चिंचवड शहराच्या दौर्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पिंपळे गुरव येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात भेट दिली. कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने अधिकमास व पुरूषोत्तम पर्वकाळ निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. रामकृष्ण मंगल कार्यालयात सोमवार ( ता. 4 ) पर्यंत चालणार्या या सोहळ्यात दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिला भजन, संध्याकाळी कीर्तन व रात्री जागर असे धार्मिक उपक्रम चालु आहेत. माजी उपमुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी या अखंड हरिनाम सप्ताहाला हजेरी लावली.
कीर्तन सोहळ्याास उपस्थिती
सध्या अजित पवार पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका व हल्लाबोल समारोपासाठी ते आले आहेत. बुधवारी सायंकाळी अजित पवार यांनी येथील निळुभाऊ फुले नाट्यगृहात राष्ट्रवादीच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर कीर्तन सोहळ्याचे संयोजक राजेंद्र जगताप यांच्या विनंतीवरून कीर्तन सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक अतुल शितोळे, शाम जगताप आदी उपस्थित होते.
अजित पवार यांचा सत्कार
त्याचवेळी येथे ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांचे कीर्तन चालु होते. पवार यांनीही काही काळ कीर्तनाचा आस्वाद घेतला. यावेळी राजेंद्र जगताप, विजय जगताप, संजय जगताप यांच्यासह जगताप परिवाराच्यावतीने कीर्तनकार प्रमोद जगताप यांच्या हस्ते अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कीर्तन सोहळ्यास उपस्थित भाविकांनीही टाळ्यांच्या गजरात पवार यांचे स्वागत केले.