‘अजैविक स्ट्रेस’मधील पार्टीची चौकशी करा

0

बारामती । बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द यथील केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस संस्थान या कृषी संशोधन करणार्‍या संस्थेने स्वच्छता अभियान फक्त कागदोपत्री राबवून जंगी मटण पार्टी केल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या संस्थेतील निदशेक व वरिष्ठ अधिकार्‍यांनी भ्रमणध्वनी बंद ठेवले असून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे. मात्र, या भागातील शेतकर्‍यांनी या पार्टीची चौकशी झालीच पाहीजे, असा आग्रह धरला आहे.

या संस्थेने नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आदिवासींच्या विकासाचे करण्यात आलेले कामही वादग्रस्त ठरले होते. या भागात आदिवासी शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमात आदिवासी शेतकर्‍यांचा सहभाग घेताना राजकीय पुढार्‍यांचा चांगला हस्तक्षेप होत होता. या कार्यक्रमाच्या अनेक तक्रारीही आदिवासी शेतकर्‍यांनी संस्थेकडे केलेल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या कार्यक्रमात एका गावात सर्व साहित्य अजून ठेवले होते. या गावातून एका राजकीय पुढार्‍याच्या माध्यमातून संस्थेचा कारभार सुरू होता. यास नांदवणफळी या भागातील आदिवासी तरुणांनी आक्षेप घेतला होता. यानंतर येथील अधिकार्‍यांची बदली करण्यात आली होती

कर्मचार्‍यांमध्ये दोन गट
संस्थेच्या एकूणच कारभाराविषयी साशंकता निर्माण व्हावी अशी परिस्थीती आहे. संस्थेत रोजंदारीवर स्थानिक वशिल्याने कर्मचारी घेतले असल्याने कर्मचार्‍यांमध्ये दोन गट पडलेले आहेत. याचा संस्थेच्या कारभारावर परीणाम होत असल्याचे दिसून येत आहे. संस्थेत सध्या मासेसंवर्धन हा एकमेव उपक्रम सुरू असून यावरच लक्ष केंद्रीत केले जात आहे. संस्थेच्या भव्यदिव्य कार्यालयात सध्या शांतताच असून अपुर्‍या निधीचे कारण दिले जात आहे.