जळगाव। नाशिक येथून येत जळगावात रेल्वेने येत असलेल्या चव्हाण कुटूंबियांच्या बॅगेतून 41 हजार 700 रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याप्रकरणीचा गुन्हा चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. परंतू हा गुन्हा रामानंदनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
नाशिकमधील नांदगाव येथील गुरूकृपानगरातील रहिवासी रविंद्र परशुराम चव्हाण (वय-47) हे 10 मे रोजी नाशिक येथून जळगावातील शिवकॉलनी येथे राहणार्या बहिणीकडे कुटूंबियांसोबत रेल्वेने येत होते. त्याच दरम्यान, रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत चव्हाण कुटूंबियांच्या बॅगेतील 41 हजार 700 रुपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. दरम्यान, जळगावात आल्यानंतर शिवकॉलनी येथे बहिणीच्या घरी पोहोचताच चव्हाण कुटूंबियांनी बॅग उघडली असता त्यांना त्यात ठेवलेले दागिने त्यांना दिसून आले नाही. बॅगेत शोधून देखील मिळाले नसल्याने अखेर चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू तो गुरूवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.