धरणगावात बूटमोजे व कपड्यांचे वाटप
धरणगाव । समाजासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, या प्रामाणिक भावनेतून काही अज्ञात दात्यांनी धरणगावातील गरीब विद्यार्थी व बालकांना मायेचा आधार दिला. विद्यार्थ्यांना शालेय गणवेशात आवश्यक असलेले बूट, मोजे तर गरीब मुलांना कपडे देण्याचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. विशेष म्हणजे मोठ्या स्वरुपाचा आर्थिक खर्च करूनही दात्यांनी आपली नावे समाजासमोर उघड केली नाही. 15 ऑगस्टचे औचित्य साधून धरणगावातील सर्वात जुनी मराठी जि.प. शाळा क्र.1 मध्ये झेंडावंदनानंतर हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमास यांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आर.एन.महाजन हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार श्री.राजपूत, पो.नि.रामदास वाकोडे, प.रा.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे, अॅड.संजय महाजन, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, नगरसेविका संगिताताई मराठे, पत्रकार विजय वाघमारे, पोलीस पाटील संघटनेचे पांडरंग सातपुते हे उपस्थित होते.
शालेय साहित्यासह कपडे वाटप
मराठी जि.प. शाळा क्र.1 मधील 35 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशात आवश्यक असलेले बूट व मोजे यावेळी मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले. त्यानंतर 35 गरीब बालकांना कपडे देण्यात आली. यावेळी सर्वच मान्यवरांनी या सामाजिक कार्याचा आपल्या भाषणात गौरवास्पद उल्लेख केला. विशेष म्हणजे तहसीलदार श्री.राजपूत यांनी विद्यार्थ्यांना कुठलीही मदत लागत असल्यास हक्काने सांगण्याची विनंती शालेय प्रशासनाला केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ते गुलाब मराठे, अरविंद ओस्तवाल, प्रल्हाद पाटील, चंदू मराठे, योगेश वाघ, राहूल मराठे, कल्पेश महाजन यांनी परिश्रम घेतले.
मदतीचा अनोखा आदर्श
साधारणपणे कुणीही कुणाला मदत केली तर संबंधित व्यक्ती किंवा संघटना आपआपला गौरव करून घेत असतात. परंतु मोठ्या प्रमाणातील आर्थिक मदतीनंतरही दात्यांनी आपल्या नावाचा कुठेच उल्लेख होणार नाही किंवा आपले नाव कुठल्याही पद्धतीने समोर येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी अज्ञात दात्यांबद्दल गौरवोद्गार काढत त्यांचे कौतूक केले.