अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

0

जळगाव । तालुक्यातील उमाळा ते चिंचाली गावाच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. गोपाळ रामदास चव्हाण (वय-45 रा.उमाळा) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरी येत असताना वाहनाने दिली धडक
गोपाळ चव्हाण हे कुटूंबियांसोबत उमाळा येथे वास्तव्यास होते. हातमजुरी करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करायचे. शनिवारी चिंचाली गावात जत्रा असल्यामुळे चव्हाण हे जत्रा पाहण्यासाठी गेले होते. रात्री उमाळा येथे घरी जाण्यासाठी चव्हाण हे निघाले. उमाळा ते चिंचाली गावाच्या दरम्यानात पायी जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. डोक्याला वाहनाचा जोरदार फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. चिंचोली येथे जत्रा असल्यामुळे रस्त्यावरून नागरिक ये-जा करीत असताना त्यांना चव्हाण हे मृत अवस्थेत दिसून आले.

अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे चिंचाली गावाबरोबर उमाळा गावात बातमी पसरली. अखेर रात्रीच चव्हाण यांनी ओळख पटली आणि त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. रविवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी कुटूंबियांनी एकच आक्रोश केला होता. तर नातेवाईकांची देखील रूग्णालयात गर्दी झाली होती. चव्हाण यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.