अज्ञात वाहनाच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी

यावल : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात रावेर तालुक्यातील मुंजळवाडीतील रहिवासी गोपाळ कडू सोनवणे (55) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी अनिता गोपाळ सोनवणे (50) या जखमी झाले. बुधवार, 20 रोजी सकाळी यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळील मोर नदीच्या पुलावर हा अपघात घडला.

पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी
भुसावळ येथून मुंजळवाडी येथे दुचाकीव्दारे गोपाळ सोनवणे व त्यांच्या पत्नी अनिता हे निघाले होते. आमोदाजवळ दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने गोपाळ कडू सोनवणे (55) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी अनिता गोपाळ सोनवणे या जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, सहा.फौजदार हेमंत सांगळे, हवालदार महेश वंजारी, किरण चाटे, विकास सोनवणे आदींनी धाव घेतली. जखमी महिलेस उपचारासाठी रवाना करण्यात आले तर गोपाळ सोनवणे यांचा मृतदेह यावल रुग्णालयांमध्ये आणल्यानंतर डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांना सोपवला. मयत गोपाळ सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा असा परीवार आहे. ते फैजपूर पोलिस ठाण्याचे हवालदार विकास सोनवणे यांचे काका तर भुसावळ येथील आरपीएफ कर्मचारी मनोज सोनवणे यांचे वडील होत.