अहमदनगर : अहमदनगर- कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने जबर जखमी झालेल्या बिबट मादीचा मृत्यू झाला आहे. या जखमी बिबट्यावर जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारण केद्रांत उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान अखेर या बिबट मादीचा मृत्यू झाला.
अहमदनगर-कल्याण महामार्गावर शनिवारी ढमाळे मळा परिसरातील राजलॉन्स मंगल कार्यालयासमोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. या बिबट्याच्या कमरेला जबर जखम झाली. त्यामुळे त्याला उठून चालता येत नव्हते. अपघाताची माहिती मिळताच काही वेळातच माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांच्या टीमने घटनास्थळावर धाव घेतली. या बिबट्याला दोन भुलीची इंजेक्शन देऊन बेशुध्द करुन पुढील उपचारासाठी बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले. त्याठिकाणी बिबट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या मात्र उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याचे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्या लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यावर हल्ला करुन त्यांची शिकार करत असतो. मात्र आता याच शिकारीच्या मागे फिरताना बिबट्यांचे अपघात होत आहेत. त्यामध्ये बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.