‘अटल’सूर्याच्या तेजाची ओळख सांगणाऱ्या काजव्यांची गरज”

0

धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

मुंबई : देशाच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात आज अंधाराचं, भीतीचं वातावरण आहे. देशवासियांच्या मनात एकाधिकारशाही, हुकुमशाहीची भीती दाटून आली असताना ‘अटल’सूर्याच्या तेजाची ओळख समाजाला करुन देण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य काजव्यांची आज गरज आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत शोकप्रस्तावावर बोलताना श्री. धनंजय मुंडे यांनी स्वर्गीय अटलजींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, “अटलजींच्या बीड व मराठवाड्यातल्या सभांची जबाबदारी माझ्यावर असायची. मी देखील ती निष्ठेने, प्रेमाने पार पाडायचो. प्रभू रामचंद्रांनी रामसेतू बांधण्यात एका खारीचा जो वाटा होता तितकाच माझा पक्षकार्यातला तो वाटा होता. अटलजींच्या एका सभेचं मी सूत्रसंचालन केलं. सभेनंतर अटलजींनी मला जवळ बोलावून माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. प्रभू रामचंद्रांनी खारीच्या पाठीवर मारलेल्या शाबासकीची अनुभूती मी त्यादिवशी घेतली व ती थाप आजही मी अभिमानाने, आनंदाने मिरवतोय…”

स्वर्गीय अटलजींच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे सांगून मुंडे पुढे म्हणाले की, अटलजी राजकारणातील आदर्शपुरुष होते. त्यांचं व्यक्तिमत्वं बहुआयामी होतं. अटलजींची भाषणं हा विचारांचा, वक्तृत्वशैलीचा फार मोठा ठेवा आहे. त्यांच्या भाषणांनी भारतीय विचारमन समृद्ध केलं. भारतीय राजकारणाला नैतिक अधिष्ठान देण्यात अटलजींचं महत्वाचं योगदान राहिलं आहे. संपूर्ण जीवन राष्ट्रकार्याला वाहून घेतलेले ते नेते होते. देशाच्या प्रगतीतलं त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. सत्तारुढ व विरोधकांमधील समन्वयानं त्यांनी भारतीय राजकारणाला, लोकशाहीला उंची प्राप्त करुन दिली, त्यांच्यासारखा सर्वमान्य नेता पुन्हा होणार नाही, अशा शब्दात मुंडे यांनी अटलजींबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

अटलजींबद्दलच्या अनेक रंजक आठवणींचे किस्से सांगून मुंडे यांनी त्यांच्यातल्या माणुसकीचे, असामान्य नेतृत्वाचे दर्शन घडवले. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड तथा बाबूजी आणि दिवंगत माजी सदस्या श्रीमती उमेशा शंकर पवार या सदस्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करुन धनंजय मुंडे यांनी त्यांनाही श्रद्धांजली वाहिली.