अट्टल गुन्हेगारांप्रमाणे खूनातील संशयितांची चुप्पी

0

पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देवून भटकाविण्याचा करताहेत प्रयत्न

जळगाव : मूळजी जेठा महाविद्यालयात विद्यार्थी मुकेश मधुकर सपकाळे (वय 23) याच्या खूनप्रकरणातील अटक करण्यात आलेल्या किरण हटकर या मुख्य संशयितांसह इतर संशयितांनी अट्टल गुन्हेगारांप्रमाणे चुप्पी साधली आहे. ताब्यात घेतल्यापासून नेमका घटनाक्रम तसेच इतर माहितीबाबत उडवा उडवीची उत्तरे देत असून संशयित तपासात पोलिसांना भटकाविण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान पोलीस खाक्या दाखविण्याल्यानंतर त्यांच्याकडून घटनाक्रमाचा उलगडा होणार शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले चॉपर किरण हटकर गेल्या दोन तीन वर्षापासुन वागवत होता. अटकेनंतर कधी मोहाडीकडे फेकुन दिले, कधी विहीरीत फेकले अशा स्वरुपाची त्रोटक माहिती संशयीताने दिल्याने अद्याप हत्त्यारही मिळून आलेले नाही.

मुख्य संशयीत किरण सहीत अरुण बळिराम सोनवणे (वय 23, रा. समतानगर), मयूर अशोक माळी (वय 18, रा. महाबळ, जाकीर हुसैन कॉलनी), समीर शरद सोनार (वय 19, रा. रिंगरोड, फॉरेस्ट कॉलनी), तुषार प्रदीप नारखेडे (वय 19, यशवंतनगर) अशांना अटक झाली आहे. तपासात व्यस्त तपासाधिकारी गुन्ह्यात समोर येणार्‍या प्रत्येक तथ्य आणि विवीध अंगाने माहिती घेवुन पुरावे संकलन आणि प्रत्यक्षदर्शीच्या शोधार्थ तपास पुढे चालवत असतांना त्या अनुषंगाने ठोस माहिती अद्यापतरी संशयीतांनी दिलेली नाही. गुन्ह्यातील प्रमुख संशयीत आणि भांडणाला कारणीभुत सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन प्रत्यक्ष घटना घडली त्यावेळी आणखी इतर कोणी आहे काय याची चाचपणी सुरु आहे.

इतर चार तरुणांची दिवसभर चौकशी
अटकेतील सहा संशयीता व्यतिरीक्त तपासाधिकारी सचिन बेंद्रे यांनी मंगळवारी दिपक हिवराळे, निहाल बाविस्कर, प्रवीण रायसिंगे, अंकुश कोळी अशा चारही तरुणांना वेगेवगळ्या पद्धतीने विचारपुस करण्यात येत होती. गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, मारेकर्‍यांचे सच्चे साथीदार कोण, घटना घडतांना उपस्थीत असणारे आणि भांडणा प्रसंगी पळून जाणार्‍यांतील मिळून न आलेल्या संशयीताबाबत विचारपुस चौकशी करण्यात आली.