जळगाव । शहारतील विविध भागातून मोबाईल, दुचाकी तसेच घराफोड्या करणार्या अट्टल चोरट्यास शनिवारी ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता त्याने चार मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. शहरातील गेंदालाल मील भागात राहणारा हा चोरटा आहे. शनिवारी दुपारी 1 वाजता अजिंठा चौफुली येथे नशेत धुत्त असताना त्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, काही दिवांपूर्वीच त्याने चोरी केली असून त्या पैशांतून मौजमजा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अतुल वंजारी, विजय पाटील, मनोज सुरवाडे, विजय शामराव पाटील, अतुल पाटील, हेमंत कळसकर यांच्या पथकाने सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर खाक्या दाखवताच त्याने मोबाईल चोरी, घरफोडी सारखे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. परंतू, नशेत असल्यामुळे तो घरफोडी केल्याची ठीकाणे स्पष्टपणे सांगत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात ठेवले आहे. नशा उतरल्यानंतर त्याची पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.