अट्टल चोरट्यांचा वीज कंपनीलाच ‘शॉक’

शिरपूर : तालुक्यातील मांडळ शिवारात 4 विजेच्या खांबांवरून विजतारा चोरीस गेल्या. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी वरीष्ठ तंत्रज्ञ भिकुलाल ईश्वर सोनवणे (40) यांनी फिर्याद दिली

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
दाखल तक्रारीनुसार सोमवारी सकाळी मांडळ शिवारातील शेती पंप ग्राहक सुनील श्रावण सोनवणे यांनी लाईट बंद असल्याची माहिती दिल्यावरून वायरमन भिकुलाल ईश्वर सोनवणे यांनी मांडळ शिवारात सुनील सोनवणे यांच्या शेतातील वीज पुरवठा करणार्‍या वीज वाहिनीची तपासणी करीत असतांना लघुदाब वीज वाहिनीवरील चार पोलवरील तिन्ही वीज तारा आढळून आल्या नसल्याने कोणीतरी अज्ञातांनी वीज तारा चोरी करून नेल्याने वीजपुरवठा बंद झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे वायरमन भिकुलाल इश्वर सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात लघु दाब वीज वाहिनीवरील चार पोलववरून तिन्ही फेजच्या 20 हजार 486 रुपये किंमतीची 960 मीटरच्या तिन्ही वीज तारा चोरी करून नुकसान केल्याची तक्रार दाखल केली. तपास नाईक रुपेश गांगुर्डे करीत आहे.