यावल- अल्पवयीन तरुणीने प्रेम करावे या मागणीसाठी अट्रावलच्या प्रेमविराने थेट तिला गावठी कट्टाच लावल्याने भेदरलेल्या तरुणीसह पालकांनी यावल पोलिसात धाव घेतल्यानंतर अट्रावलच्या प्रेमविरासह यावलच्या तिघांच्या पोलिसांनी बुधवारी मुसक्या आवळल्या होत्या तर यावलच्या संशयीताकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता. चौघा संशयीताना गुरुवारी यावल न्यायालयात हजर केले असता 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसात तक्रार दाखल होताच आवळल्या मुसक्या
बुधवारी दुपारी यावल पोलिस ठाण्यात अट्रावल येथील एका कुटुंबीय तक्रार देण्याकरीता आले होते. त्यात अट्रावल येथे एका तरूणाकडे कट्टा असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर निरीक्षक डी.के.परदेशी, पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, डीबीचे हवालदार असलम खान, संजय देवरे, सुशील घुगे, राजेश वाडे, विजय जावरे, पंकज फिरके या पथकाने अट्रावल गाठले. गिरीष अनिल लोहार या तरूणाकडे चौकशी केली तेव्हा त्याने गावातील राजेंद्र बाबुराव लोहार, अशोक गोवर्धन तायडे यांची नावे पुढे केली तेव्हा तिघांना ताब्यात घेत गावठी कट्ट्याबद्दल विचारणा केली असता तिघांनी हा कट्टा यावल शहरातील बोरावल गेट भागात राहणार्या युवराज राजु भास्कर यांच्याकडे असल्याचे सांगितले. पोलिस पथकाने तिघांना घेत यावलमधील बोरावल गेट येथे येथून युवराज भास्करला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरात व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तर या चौघांविरूध्द यावल पोलिसात आर्मअॅक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.
पीडीत कुटुंबाला धमकावल्याची तक्रार
या प्रकरणातील तक्रारदार पीडीत मुलीच्या घरी आठ ते 10 संशयीतांनी 14 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास येत केस मागे घेण्यासंदर्भात धमकावल्याचा आरोप पीडीत मुलीच्या वडिलांनी केला आहे. संबंधितानी आमच्याकडे आठ ते दहा पिस्तोल असून केस मागे न घेतल्यास संपूर्ण भिल्ल वस्ती पेटवून टाकू, असा दम दिल्याचे पीडीतेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात आदिवासी संघटना तीव्र आंछोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहेत.