अडवाणींसारखी माझी परिस्थिती!

0

जळगाव। “जिल्ह्यात भाजपा पक्ष निर्माण व्हायच्या अगोदर पासून जनसंघात काम करीत होतो. जनसंघाचा अर्थात भाजपाचा पहिला सरपंच, पहिला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडुन येण्याचा मान मिळाला. जिल्ह्यात पक्ष स्थापनेसाठी रात्रंदिवस कार्य केले. आज हा पक्ष जिल्ह्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पक्ष वाढीसाठी ज्याने मोठे योगदान दिले त्यांच्यावर जर पक्षाने अन्याय केला असेल तर भावनांचा उद्रेक होणे साहजिकच आहे. पण असे असले तरी पक्षाशी एकनिष्ठ राहून नवीन आलेल्यांना पुढे जाण्यासाठी संधी द्यावी व जुन्याने मार्गदर्शन करत रहावे असे सांगत आज जी परिस्थिती लालकृष्ण अडवाणींची आहे तीच माझी झाली आहे.” अशा शब्दात माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात आपली खंत व्यक्त केली. शहरातील एमआयडीसी परिसरातील बालाजी लॉन येथे भाजपाचा जिल्हास्तरीय कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी खडसे समर्थकांनी आमदार खडसे यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्यात यावा यासाठी घोषणाबाजी केली. त्याप्रसंगी समर्थकांना शांत करतांना ते बोलत होते.

…तर अ‍ॅबॉर्शन करा !
जिल्ह्यात पक्ष उभारणीसाठी आमदार खडसेंनी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे पक्षाला मोठे स्वरुप आले आहे. मात्र त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप झाल्याने त्यांच्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला. ज्यांनी पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्या पाठीशी पक्ष नसल्याची खंत व्यक्त करत माजी जिल्हाध्यक्ष डॉ. बी.एस.पाटील यांनी यांनी “नाथाभाऊंची प्रसुती वेदना समजून घ्या आणि जर प्रसुती वेदना समजत नसतील तर गर्भपात म्हणजेच अ‍ॅबॉर्शन करा” अशा तीव्र शब्दांत भावना व्यक्त केली.

‘1 बुथ 50 यूथ’चा संकल्प
पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्ष संघटनासाठी ‘1 बुथ 10 यूथ’ अशी संकल्प राबविण्यात येत होती. मात्र आता पक्षाने पुन्हा निर्देेश जारी केले असून ‘1 बुथ 50’ यूथचा संकल्प करावयाचे असल्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात 3 हजार 16 बुथ सथापन करण्यात येणार आहे. पक्ष संघटनासाठी जिल्ह्याभरात मेळावे घेण्यात येणार आहे. मेळाव्याच्या तालुकानिहाय तारख्या निश्‍चित करण्यात आल्या असून मेळाव्यास उपस्थित राहून पक्षादेशा पाळावे असे यावेळी कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.

खडसे समर्थक आक्रमक
जिल्हा मेळाव्यात खडसे समर्थक अतिशय आक्रमक झाले. त्यांनी समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत नाथाभाऊंना पुन्हा मंत्रीमंडळात घ्यावे अशी मागणी केली. यानंतर नाथाभाऊ भाषण करण्यासाठी उभे राहिल्याबरोबर त्यांनी समर्थकांना शांत केली. खडसे यांनी अतिशय आक्रमक भाषण करत आपल्या मनातील व्यथा सांगितली. यानंतर ते जिल्हा मेळाव्यातून निघून गेले. यासोबत त्यांच्या समर्थकांनीही काढता पाय घेतला.

महाजन आले अन खडसे गेले!
जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खडसे समर्थकांनी गोंधळ घातला. त्यांना शांत करण्याचे आवाहन खडसेंनी केले. खडसे बोलत असतांना मंत्री महाजन मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले. महाजन येताच खडसेंनी भाषण थांबविले व मेळाव्यातून निघून गेले. खडसें सोबत त्यांचे समर्थकांनीही काढता पाय घेतला. खडसे जातांना महाजन यांनी त्यांना ‘भाऊ बसा’ अशी विनंती केली. मात्र खडसेंनी हस्तांदोलन करत येतो सांगून ते निघून गेले.

नाथाभाऊंना मंत्री मंडळात घ्यावे
याप्रसंगी गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंना मंत्रीमंडळात घेण्यात यावे अशी मागणी केली. ते म्हणाले की, “नाथाभाऊंवर अनेक आरोप झाले त्यामुळे त्यांनी स्वतःहून पक्षाची प्रतिमा लक्षात घेत मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नाथाभाऊंना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्यात यावे अशी माझी देखील इच्छा आहे मात्र हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने याविषयी बोलणे याठिकाणी उचीत नाही!” जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी पक्ष शिस्त पाळावे घोषणाबाजी करु नये, ’आगे बढो’ आणि ’पिछे बढो’च्या घोषणांमुळे कोणीही ’आगे’ किंवा ‘पिछे’ जात नसल्याचे सांगत ना. गिरीश महाजन यांनी पक्षाची सर्वांवर नजर असल्याचे सांगितले.

सर्व पक्ष नष्ट होतील
भाजपाच्या कामगिरीमुळे आज अनेक जण भाजपात येत आहे. येणार्‍या काळात अनेक दिग्गज हे भाजपात येतील. जिल्ह्यात भाजपा शिवाय कोणताही पक्ष शिल्लक राहणार नाही संपुर्ण जिल्हा हा भाजपामय होणार असल्याचे मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याची खर्‍या अर्थांने कॉग्रेसमुक्तीकडे वाटचाल सुरु असून राष्ट्रवादी क ॉग्रेस, कॉग्रेस हे पक्ष पूर्णपणे नष्ट होतील असे महाजन यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
या मेळाव्यास ना. गिरीश महाजन आणि आ. एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार रक्षाताई खडसे, खासदार ए.टी.पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, राजूमामा भोळे, उन्मेश पाटील, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहीणी खडसे-खेवलकर, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, डॉ. बी.एस. पाटील, ’बेटी बचाओ बेटी पढाओ’ चे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, किशोर काळकर, गोविंद अग्रवाल यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.