नवी दिल्ली : देशातील गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नक्षलवादी कारवायांविरोधात सुरक्षा यंत्रणांनी मोहिम तेज केली असून मोदी सरकार आल्यानंतर 10 नक्षल प्रभावाखालील राज्यांमधून 2014 ते 30 जून 2017 पर्यंत 442 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे. केंद्रिय राखीव पोलिस दलाने ऑपरेशन ऑल आउट सुरू करण्यात आलेले आहे. त्यात नक्षलवाद्यांचे उच्चाटन कसे करायचे याच्या योजना आहेत. नक्षलवादी शरण येणार असतील तर तशी सोयही आहे. त्यानुसार 384 नक्षली ताब्यातही घेण्यात आले आहेत. छत्तीसगड नक्षलावादाने सर्वात जास्त पिडित राज्य आहे. या वर्षी जून पर्यंत तेथे 52 नक्षलींना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. एकट्या छत्तीसगडमधून 384 नक्षलींना त्यांनी अटक केले आहे. 11 मार्च रोजी सुकमामध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याने 25 जवान शहीद झाले होते. त्यानंतर नक्षलविरोधी मोहिम अधिक तीव्र झाली. नुकतेच सुकमामध्ये ऑपरेशन प्रहार हाती घेतले होते. त्यात 20 नक्षलवादी ठार झाले, तर तीन जवान शहीद झाले आणि सात जवान जखमी झाले.