अण्णांचा हेतू स्वच्छच

0

अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून त्यांचे वजन साडेतीन किलोने घटले आहे. अण्णा आपल्या मागण्यांपासून मागे हटायला तयार नाहीत. मात्र, त्यांनी आंदोलनाच्या आपल्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांनी पाय ठेवू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचा रोष त्यांनी ओढवून घेतला आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला संघाची फूस आहे असा गंभीर आणि खळबळजनक आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत. शनिवारी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे अण्णांची भेट घेणार होते. मात्र, त्यांना व्यासपीठावर येऊ न देण्याचा निर्णय अण्णा हजारेंनी घेतला. यानंतर दुसर्‍याच दिवशी हार्दिक पटेल यांनी आंदोलनाला संघाची फूस असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर अशा पद्धतीने टीका झाल्याने हार्दिक पटेल काँग्रेसच्या मुखातून बोलत असल्याचा वास येत आहे. मी गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे प्रश्‍न मांडत आंदोलन पुकारले होते. माझ्यासारख्या आंदोलकांना अण्णा त्यांच्या व्यासपीठापासून दूर का ठेवत आहेत? तुमचा नारा सरकारविरोधात आहे तर मग विरोधी पक्षातल्या एकाही व्यक्तीला आंदोलनात सहभागी घेण्यापासून तुम्ही का रोखलेत, असेही प्रश्‍न हार्दिक पटेल यांनी उपस्थित केले आहेत. दिल्लीवाल्यांच्या इशार्‍यावर मला अण्णा हजारे यांनी मंचावर येऊ दिले नाही, असेही हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीने पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची एक मुलाखत घेतली याच मुलाखतीत हार्दिक पटेल यांनी हे गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. अण्णा हजारे म्हणतात, मी 40 पेक्षा जास्त पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली, पण एकाही प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्याकडून आलेले नाही. 40 पेक्षा जास्त पत्रे लिहिण्यापेक्षा पहिल्या 5 ते 6 पत्रांना न मिळालेल्या प्रतिसादानंतर अण्णा हजारे उपोषणाला का बसले नाहीत? असाही प्रश्‍न हार्दिक पटेल यांनी विचारला आहे. ‘हार्दिक पटेल हे पाटीदार आंदोलनातून मोठे झाले आहेत. त्यांचे आता जेवढे वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अण्णांचा सामाजिक कामाचा अनुभव आहे’, अशा शब्दांत अण्णांच्या आंदोलनात पहिल्यापासून सोबत असणारे सुरेश पाठारे यांनी हार्दिक पटेल यांना उत्तर दिले आहे. ‘हार्दिक पटेल हे पाटीदार आंदोलनातून मोठे झाले आहेत. त्यांचे आता जेवढे वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अण्णांचा सामाजिक कामाचा अनुभव आहे. ज्या-ज्या वेळेस अण्णांनी काँग्रेस असताना आंदोलने केली त्यावेळेस त्यांना संघाचे समर्थक ठरवले गेले, तर भाजपविरोधात आंदोलने केली, तर काँग्रेसधार्जिणे ठरवले जाते. ही परंपरा चालत आली आहे.

सन 2011ला अण्णांनी जेव्हा रामलीला मैदानावर सरकारविरोधात शड्डू ठोकला तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. प्रतिमहात्मा गांधी, अशी अण्णांची प्रतिमा तयार करण्यात आली होती. तेव्हाचे आंदोलन आणि आत्ताचे आंदोलन यामध्ये लोकपाल हा विषय सोडला तर बाकी विषय हे शेतकर्‍यांशी निगडित आहे. शेतकरी हा या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. पूर्वीच्या आंदोलनात शहरी भागाशी निगडित होते. त्यामुळे शहरात राहणार्‍या लोकांची संख्या तेव्हा जास्त होती. पण आता शेतकर्‍यांना दिल्लीत येणे थोडसे खर्चीक आहे. त्यामुळे आंदोलनाला गर्दी कमी आहे. यावेळेस अण्णांनी आंदोलनाची घोषणा केली त्यानंतर पोलिसांनी दिल्लीत येण्यास अडथळे निर्माण केले, तर अनेक ट्रेन रद्द केल्या. त्याचा परिणाम आंदोलनावर दिसत आहे. जनतेला अण्णांबाबत आणि त्यांच्या आंदोलनांबाबत गेल्या 40 वर्षांपासून माहिती आहे. हार्दिक तारतम्य नसल्यासारखे बोलत आहेत. त्यांना अण्णांच्या स्टेजवर जाऊन बोलायचे आहे. तशी त्यांची इच्छा दिसते. पण अण्णांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला स्टेजवरून भाषण देता येणार नाही. हवे तर ते पाठिंबा देण्यासाठी इथे येऊ शकतात. त्यामुळे हार्दिक पटेल यांची तडफड होत असल्याचे अण्णांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. निवडणूक सुधारणा, लोकपाल-लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी याचसोबत शेतकर्‍यांशी निगडित 7 प्रमुख मागण्या या नव्या मुद्द्यांवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानात पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या चार वर्षांत 42 वेळा अण्णांनी मोदी सरकारकडे याच मागण्यांविषयी पाठपुरावा केला. मात्र, काहीही उत्तर मिळाले नाही. अण्णांचे हे 17 वे आंदोलन आहे. मात्र, काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात जसे त्यांचे आंदोलन आग ओकत, तो अंगार आता पाहायला मिळत नाही, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. उपोषणापासून अण्णांना परावृत्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला.

राज्यसरकारचा निरोप घेऊन जलसंधारणमंत्री गिरीश महाजन गेले होते. मात्र, अण्णांनी त्यांच्या विनंतीला भीक घातली नाही. आरपारची लढाई लढायचीच या निर्धारावर ते ठाम राहिले. मंगळवारी पुन्हा एकदा अण्णांच्या आणि सरकारच्या मध्ये समझोता घडवण्याच्या प्रयत्नासाठी गिरीश महाजन दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्र सरकार अण्णांची समजूत कशी काढते, ते पाहावयाचे. कारण या प्रतिसादावरच सत्याग्रहाचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसच्या राजवटीत अण्णांची समजूत काढण्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना यश आले होते. विलासरावांनी पंतप्रधान मनमोहन सिंहांच्या सरकारच्या गळी अण्णांच्या मागण्या उतरवण्यात कसब पणाला लावले होते. त्याची आठवण अण्णांना या आंदोलनावेळी झाली. अण्णांचा हा सत्याग्रह सत्तेच्या खुर्चीला हादरा देऊ पाहत आहे. सत्याग्रहाच्या पहिल्याच दिवशी लोकायुक्तांच्या नियुक्तीवरून सर्वोच्च न्यायालयाने 12 राज्यांच्या मुख्य सचिवांना खडसावले हे अण्णांच्या पथ्यावर पडणार आहे. अण्णांच्या आंदोलनातून काय निघायचे ते निघेल. परंतु, एका टोकाला जाऊन अण्णांवर चिखलफेक करणे या घडीला संयुक्तिक दिसत नाही. अण्णांनी शिवसेना भाजपच्या युती सरकारच्या काळातही आंदोलने करून मंत्र्यांना राजीनामे द्यायला भाग पाडले, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही त्यांनी आपला हा बाणा सोडला नव्हता. तेव्हाही काही मंत्र्यांना घरी बसावे लागले होते. अण्णांच्या हेतूवर शंका घेणे गैर वाटते. मात्र, त्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेणारे राजकीय पक्ष आहेत, मोदींनीही त्याचा गैरफायदा उठवला होताच की, हे होऊ नये.