अण्णांच्या मातोश्रींच्या स्मृतिदिनासाठी प्रशासन कामाला लागले
राळेगणसिद्धी (देविदास आबूज) : सुमारे आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. आता वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे सर्व पाहता केंद्र सरकाच्या विरोधातील अण्णांच्या आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने चालविला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी हजारे यांच्याशी केलेली जवळीक केंद्राच्या कितपत कामी येते याचे उत्तर आगामी काळात दिसणार आहे. दरम्यान, गुजरात विधासभा निवडणूक सुरू असताना अण्णांनी काही गडबड करू नये म्हणून ही जवळीक आहे, असाही एक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बंद खोलीत चर्चा!
लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोग तसेच शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात अण्णा हजारे हे केंद्र सरकारवर नाराज आहेत. केंद्र सरकाराविरोधात आंदोलनाचे हत्यारदेखील त्यांनी उगारले होते. त्यातच सध्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. हजारे यांच्या सरकारविरोधी इशार्याचा परिणाम गुजरातच्या निवडणुकीवर होऊन त्याचा फटका भाजपला बसू शकतो. यामुळेच सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राळेगणसिद्धी गाठले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हजारे यांच्याशी बंद खोलीत चर्चादेखील केल्याची माहिती आहे. राळेगणसिद्धी हे ऊर्जा देणारे गाव असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी अण्णांवर स्तुतिसुमने उधळली. अण्णांनी मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी अण्णांना कोणती ऊर्जा दिली हे गुलदस्त्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत लोकांमध्ये नाराजी असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले असल्याचे प्रशस्तिपत्र अण्णांनी मुख्यमंत्र्यांना राळेगण भेटीत दिले होते.
अण्णांच्या मातोश्रींचा स्मृतिदिन; प्रशासन कामाला लागले
मुख्यमंत्र्यांच्या राळेगणसिद्धी भेटीला आठवडा उलटण्यापूर्वीच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांच्या मातोश्री कै. लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत राळेगणसिद्धी येथे ग्रामीण आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या स्मृतीदिनी दरवर्षीच रक्तदान, आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी मंत्री महाजन यांनी पुढाकार घेतला हे विशेष! 19 नोव्हेंबररोजी होणार्या या आरोग्य शिबिराच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या उपस्थितीत व हजारे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक झाली. या बैठकीला जिल्हा प्रशासनातील सर्वच विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. शिबिरात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची विनामूल्य तपासणी करणार आहेत. मंत्री महाजन हेदेखील शिबिराला उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारविरोधात हजारे यांनी उगारलेल्या आंदोलनाची धार गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमी करण्याचाच राज्य सरकारचा हा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा या जवळकीनंतर सुरू झाली आहे.