केंद्र सरकारकडून 11 मागण्या तत्वतः मान्य
नवी दिल्ली : शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वृद्ध शेतकर्यांना दरमहा पाच हजारांची पेन्शन, केंद्रात लोकपाल व राज्यांसाठी लोकायुक्तांची नियुक्ती व निवडणूक सुधारणांबाबत विविध मागण्यांसाठी राजधानी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आमरण उपोषणास बसलेले थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुमारे 11 मागण्या केंद्र सरकारने तत्वतः मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा लेखी मसुदा केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांना सादर केल्यानंतर हजारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नारळपाणी घेऊन आपले उपोषण तब्बल सातव्या दिवशी सोडले. झपाट्याने कमी झालेले वजन, घटलेला रक्तदाब आणि शरीरातील कमी झालेली साखरेची पातळी पाहाता, अण्णांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. तथापि, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार अण्णांनी व्यक्त केला होता. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यशस्वी शिष्टाई करून केवळ आश्वासनांवर अण्णांचे उपोषण सोडविले आहे. या मागण्यांची सहा महिन्यांत पूर्तता करा, अन्यथा पुन्हा मोदी सरकारविरोधात उपोषण सुरु करू, असा इशाराही यावेळी हजारे यांनी सरकारला दिला. याप्रसंगी अण्णांशी केंद्राच्यावतीने वाटाघाटी करणारे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती.