अण्णाभाऊंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा दोन महिन्यात येणार

0

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई:- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा येत्या दोन महिन्यात प्राप्त होईल त्यांनंतर त्यासाठी लागणारा खर्च आणि पुढील कार्यवाही घोषित केली जाईल अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रालयात जनशक्तिशी बोलताना दिली.

अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे ही खूप वर्षांपासूनची मागणी आहे. या सरकारच्या काळात दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या संदर्भात एक कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिटीची बैठक बुधवारी कांबळे यांच्या दालनात झाली. चिरागनगर येथे ज्या ठिकाणी स्मारक प्रस्तावित आहे त्या ठिकाणी 700 घरं आहेत, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही विकासकांनी प्रस्ताव दिले आहेत. त्या विकासकांसोबत 23 तारखेला बैठक आयोजित केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात डिजिटल लायब्ररी, अभ्यासकेंद्र, शाहिरी कला शिकवणारे केंद्र, सभागृह, अण्णाभाऊंच्या विचारांचा प्रचार प्रसार, त्यांचे समग्र साहित्य आदी ठेवले जाणार आहे. आता या स्मारकाच्या संदर्भात प्राथमिक स्तरावर चारचा चालू असून 2 महिन्यात आराखडा दिला जाईल, असे कांबळे यांनी सांगितले.