शिरपूर । भ्रष्टाचारविरोधातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन येथील भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे सक्रीय कार्यकर्ते ठाणसिंग पाटील यांनी केले आहे. 23 मार्चपासून दिल्ली येथे अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत. लोकपाल कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, लोकांयुक्तांची नेमणूक करावी, केंद्रातील लोकपालप्रमाणेच प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा लागू करावा, कृषीमालास खर्चाच्या आधारावर 50 टक्के भाववाढ देवून योग्य भाव द्यावा यासह अनेक मागण्यांसाठी अण्णा हजारे यांचे आंदोलन आहे.
सक्रिय पाठिंबा द्या
देशात कुणाचीही सत्ता असली तरी भ्रष्टाचारावर नियंत्रणासाठी गांभीर्याने प्रयत्न होतांना दिसत नाहीत. लोकपाल नियुक्तसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दोनदा सरकारला फटकारले मात्र लोकपाल नियक्तीबाबत टाळाटाळ सुरू आहे. भ्रष्टाचारामुळेच शेतकर्यांच्या हिताचे व आर्थिकसह सामाजिक, शैक्षणिक सुबत्ता आणणारे साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ व अन्य सहकारी प्रकल्प बंद पडले आहेत. बँका बुडाल्या. बुडवणारे देशाबाहेर पळून गेले. अण्णा हजारेंमुळे माहितीच्या अधिकारासारखा मौलिक अधिकार जनतेला मिळाला. त्यांच्या आंदोलनात सहभागी होवून सक्रीय पाठिंबा द्यावा असे आवाहन ठाणसिंग पाटील यांनी केले आहे.