नवी दिल्ली : उत्तर कोरियाने अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या आंतरखंडिय क्षेपणास्त्राची चाचणी केली असून या प्रलंयकारी क्षेपणास्त्राच्या टप्प्यात अमेरिकेतील प्रमुख शहरे आली आहेत. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांनी या चाचण्यांबद्दल समाधान व्यक्त केले असतानाच जगभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. चार जुलै रोजी अशीच एक चाचणी उत्तर कोरियाने केली होती.
कोरियन सेन्ट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार हे आंतरखंडिय क्षेपणास्त्र ह्वासोंग- १४ मिसाईल तीन हजार ७२५ किलोमीटर उंचीवर पोहोचले. तेथून ९९८ किलोमीटर अंतरावर समांतर जाऊन ते जपानच्या समुद्रात पडले. अमेरिका, चीन, जपान आणि दक्षिण कोरियाने या चाचण्यांचा निषेध केला आहे.
कोणतीही विशेष यंत्रणा कार्यान्वित न करता जर क्षेपणास्त्र सोडले तरी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस, देनवेर आणि शिकागो या शहरांपर्यंत हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रांसह सहज पोहोचू शकते. त्यात न्यूयॉर्क आणि बोस्टन पर्यंत पोहोचण्याची क्षमताही आहे. उत्तर कोरियाने या आधी केलेल्या चाचणीतील क्षेपणास्त्र अलास्कापर्यंत भेद करू करू शकते. केसीएनए वृत्तसंस्थेने सांगितल्याप्रमाणे उत्तर कोरियाने अमेरिकेला इशारा देताना म्हटले आहे की यांकींनी म्हणजेच अमेरिकींनी आमच्या देशाकडे वाकड्या नजरने पाहिले तर आम्ही धडा शिकवू. अमेरिकेची संभावना साम्राज्यवादी पशू अशीही त्यांनी केली आहे.
अमेरिकेची प्रतिक्रिया…
अमेरिकेने उत्तर कोरियाच्या आंतरखंडिय क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध करताना चीन आणि रशियावर याची विशेष आणि एकमेव जबाबदारी असेल असे विधान केले आहे. क्षेपणास्त्रे व अण्वस्त्र चाचण्या हल्लेखोर मनोवृत्तीने बेबंदपणे होत आहेत असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रेक्स टीलरसन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षण परिषदेच्या धोरणांचे हे उद्धट उल्लंघन आहे असे म्हटले आहे. त्यांनी सर्व दोष चीन आणि रशियाचाच आहे. हे देशच उत्तर कोरियाला आर्थिक सहकार्य करातात, असे टीलरसन यांनी म्हटले आहे.