अतिक्रमणाबाबत सत्ताधारी उदासिन

0

भुसावळ। पालिकेतील सत्ताधारी भाजपा नगरसेवकाने म्युनिसिपल मार्केटसह शहरात दोन ठिकाणांवर अतिक्रमण केले आहे. पालिका प्रशासनाच्या बोटचेपी भूमिकेमुळे सर्वसामान्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. तरीदेखील पालिकेतर्फे यासंदर्भात कारवाई होत नसल्यामुळे या अतिक्रमणासंदर्भात जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस विवेक नरवाडे यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच डॉ. नि. तु. पाटील यांच्या सत्यनारायण पूजन आंदोलनास पाठींबा देणार असल्याचे सांगितले.

जनतेने दाखविलेल्या विश्‍वासाला गेली तडा
भुसावळ पालिकेवर भाजपची एक हाती सत्ता असून भाजपाच एक नगरसेवक अतिक्रमण करतो, हे नक्कीच पक्षासाठी भुषणावह बाब नाही यामुळे जनतेने ठेवेलेल्या विश्वासाला तळा जात आहे. पालिकेत विरोधी बाकावर असताना भाजपा नगरसेवकांनी अतिक्रमणाविषयी आक्रमक झाले होते. मात्र आता सत्तेत आल्यावर विरोधकांचाच कित्ता गिरवित आहे. यासंदर्भात चहूबाजूंनी टिका होत असताना सुद्धा अतिक्रमण चालू ठेवणे हा मुजोरीपणाचा कळस आहे आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील म्युनिसिपल मार्केटच्या दुसर्‍या माळ्यावर टिनपत्रे टाकून अतिक्रमण केले असून या पत्राच्या शेडला शटर बसविले आहे, तरीही पालिका प्रशासन सुस्त आहे. सर्वसामान्य नागरिक असे करतांना आढळला असता तर लगेच कर्मचार्‍यांनी तेथे जावून जागा मोकळी केली असती परंतु सत्ताधारी नगरसेवकाचे अतिक्रमण असल्याने आता सर्व मुग गिळून गप्प आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी नरवाडे यांनी केली आहे.