अतिक्रमण अधिक्षक खान यांची फेरचौकशी करा

0

जळगाव । महापालिकेचे आरोग्य निरीक्षक तथा अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांनी 2012-13 साली अक्सानगर येथील गोडावूनमधून सुमारे 13 लाख रूपय किंमतींचे गुरांचे चामडे परस्पर विकून पैसांचा अपहार केला होता या अपहाराची फेर चौकशी करण्याची मागणी जळगाव जिल्हा जागृतजनमंचाद्वारे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या अपहाराची विभागीय चौकशी जे. आर. बंकापुरे यांनी केली असता या चौकशीत खान हे दोषी आढळले होते.

15 लाखांच्या अपहाराचा आरोप
या चौकशी अहवालात खान यांच्याकडून वसूलपात्र रक्कमेची वसुली करावी, त्यांना पदावनत करावे तसेच बडतर्फे करण्याची शिफारस केली होती. मात्र, तात्कलीन आयुक्त संजय कापडणीस यांनी खान यांची केवळ वेतनवाढ बंद केली. ही केवळ प्रशासकीय अपौचारिकता असल्याचा आरोप जळगाव जिल्हा जागृतजनमंचातर्फे करण्यात आला आहे. या अपहारात महापालिकेचे सुमारे 13 ते 14 लाख रूपयांचे खान यांनी हडप केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खान यांची फेर चौकशी होऊन अपहार केलेल्या पैशांची वसूली करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनांवर शिवराम पाटील, कॉ. अनिल नाटेकर यांच्या सह्या आहेत.