पिंपरी-पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडून हॅरिस पुलाला समांतर दोन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलाच्या कामासाठी अडथळा ठरणा-या अतिक्रमिणांवर व झोपडपट्ट्यांवर पुणे महापालिकेने आज शनिवारी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे हॅरिस पुलाच्या कामाला गती मिळणार आहे.
हॅरिस पुलावर वाहनांची गर्दी वाढून दापोडी, बोपोडीमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने हॅरीस पुलाला समांतर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन्ही बाजुंनी दोन पुलाचे काम पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडून एकत्रित करण्यात येत आहे. त्यामध्ये पिंपरीकडून पुण्याला जाणा-या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर, पुण्याकडून पिंपरीकडे येणारा पूल अतिक्रमणांमुळे अर्धवट स्थितीत आहे.
बापोडी येथील अतिक्रमणे व झोपडपट्ट्या हटविल्याशिवाय या पुलाचे काम करता येणार नव्हते. त्यामुळे अखेर पुणे महापालिकेने शनिवारी सकाळी कारवाई करत ही अतिक्रमणे हटविली आहेत. महापालिका अधिकारी व मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण करण्यात आली. त्यामुळे हॅरिस पुलाच्या कामाला गती मिळणार असून लवकरच दोन्ही बाजुचे समांतर वाहतुकीसाठी खुले होऊ शकतील.