स्थापत्य विभागाच्या अभियंत्यासह डॉ. प्रवीण अष्टीकर केले रस्त्यांचे निरीक्षण
खड्डे बुजविण्याचे दिले निर्देश
पिंपरी-पिंपरी-चिंचवड या महानगरामध्ये दिवसेंदिवस नागरिकीकरण वाढते आहे. त्यामुळे येथील लोकसंख्येतही वाढ होते आहे. महानगरपालिकेच्यावतीने शहरामध्ये विकासकामे सुरू असतात. कुठे रस्त्यांची कामे, तर कुठे जलवाहीनीची कामे तर कुठे विद्युत वाहिनी टाकण्याची कामे सुरू असतात. मात्र ही विकासकामे सुरू असताना शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. बाकीच्या विकासाच्या गोष्टी सुरू असताना या खड्ड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होते आहे. वारंवार प्रसिद्ध होणार्या बातम्यांमुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी शुक्रवारी स्थापत्य विभागाच्या अभियंत्यासह मुख्य रस्त्यांची पाहणी केली. पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले आहेत. दरम्यान, गुरुवारी महापौर नितीन काळजे यांनी दोन दिवसात खड्डे बुजविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
किरकोळ पावसात रस्त्याची चाळण
पिंपरी-चिंचवड शहरात पावसाचे प्रमाण तुरळक स्वरूपात आहे. अजुन मोठा आणि जोरदार पाऊस सुरू झालेला नाही. तरही रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरामध्ये तब्बल दोन हजार 379 खड्डे आहेत. त्यापैकी 2 हजार 30 खड्डे बुजविल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला असून 349 खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. पावसाळ्यात होणारे खड्डे ही नवी बाब नसली तरी, किरकोळ पावसात या रस्त्यांना खड्डे पडलेत. मग जर जोरदार पाऊस सुरू झाला तर रस्त्यांची अवस्था कशी असेल? याबाबत नागरिकांमधून नाराजीची चर्चा ऐकण्यास मिळते आहे. याची दखल घेऊन महापौर नितीन काळजे यांनी शहर अभियंता अंबादास चव्हाण येत्या दोन दिवसात शहरातील सर्व खड्डे बुजविण्यात यावेत असे आदेश दिले होते.
4 तास केली पाहणी
महापौरांच्या सूचनेनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्यासह शहरातील मुख्य रस्त्यांची पाहणी केली. सकाळी साडेनऊ वाजता पाहणीला सुरुवात केली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील संपूर्ण मुख्य रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले आहेत. डॉ. प्रवीण अष्टीकर म्हणाले, संपूर्ण शहरातील मुख्य रस्त्यांची पाहणी केली. काही ठिकाणी खड्डे आहेत. स्थापत्य विभागामार्फत खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरु आहे. खड्डा बुजविल्यानंतर खड्ड्यात पाणी साचले जात आहे. त्यामुळे पुन्हा खड्डा पडतो आहे. डांबर, पेव्हींग ब्लॉक, मुरुम आणि जेटपॅचरने खड्डे बुजविले जात आहे. त्वरित खड्डे बुजविण्याचे निर्देश स्थापत्य विभागाच्या अधिकार्यांना दिले आहेत.