तीन राज्यातील घटनांचा निषेध ; प्रशासनाला निवेदन
यावल:- जम्मू काश्मिरसह उत्तरप्रदेश व गुजराथ राज्यात अल्पवयीन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदु-मुस्लीम एकता मंचच्या वतीने गुरूवारी सायंकाळी शहरातून भव्य मूक मोर्चा व कँडल मार्च काढण्यात आला. या मोर्चात बालिकांचा मोठ्या प्रमाणाावर सहभाग होता. निर्भयांना न्याय मिळालाच पाहिजे, गुन्हेगांराना केवळ फाशीची शिक्षा द्या अशा आशयाचे फलक बालिकांच्या हाती होते. मोर्चात सर्व धर्मीयांचा सहभाग होता. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रवीण भिरूड, तुषार घासकडबी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांना पाच मुलींनी निवेदन सादर केले.
काश्मीरमधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव व गुजरातेतील सुरत येथील निर्भयांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ येथील हिंदू-मुस्लीम एकता मंचच्या वतीने शहरातून भव्य कँडल मार्च काढण्यात आला. मोर्चात महिला, मुलींसह सर्व-धर्मीय नागरीकांचा सक्रिय सहभाग होता. आठवडे बाजार, सुदर्शन चित्र मंदिर, जे.डी.सी.सी.बँक, चावडी रोड, जुना भाजी बाजार, बारीवाडा, खिर्नीपुरा, बुरूज चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयात आला. या प्रसंगी नायब तहसीलदार प्रवीण भिरूड, तुषार घासकडबी यांना फौजीया खाटीक, निकहत शेख सिराज, शगुप्ता नईम पटेल, अलफिया अयान खान, अनम शेख इब्राहीम या पाच मुलींनी निवेदन सादर केले. निवेदनात आरोंपीना फाशीची शिक्षेची मागणी करून निर्भयांना न्यायाची मागणी केली. मोर्चा अत्यंत शिस्तबध्द व शांततेत पार पडला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, फौजदार सुनीता कोळपकर व सहकार्यांनी चोख बंदोबस्त राखला.