धुळे । जम्मु काश्मिरातील कठुआ, उत्तरप्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत, महाराष्ट्रातील दोंडाईचा, कळमसरे येथे बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात सर्वधर्मीय इन्साफ आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. सर्व समाजातील नागरिकांचा या मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या विशाल मूक मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, पीडितांच्या कुटुंबीयांना संरक्षण व आर्थिक सहाय्य द्यावे, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
निदर्शकांची 50 हजारांवर उपस्थिती
शहरातील तिरंगा चौकातून दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. चार वाजेच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी सर्व जातीधर्मातील मुलींनी प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांना मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात अंदाजे 50 हजारांच्या आसपास जनता सहभागी झाली होती. निषेध नोंदविण्यासाठी मोर्चात लांब-लचक काळा कापड हातात घेवून मोर्चकर्यांनी आपला निषेध नोंदविला. शिवाय, काळ्या टोप्या, काळे टी-शर्ट तसेच काहींनी दंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या. तर काही तरुणांनी चेहर्यांवर काळा रंग चढविला होता. मोर्चेकर्यांनी एका प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देवून त्याला हवेत लटकविले होते. त्याचीही मिरवणूक काढण्यात आली. जुबैर शेख, आसिफ शाह (मुल्ला), रफीक शेख, युसुफ मुल्ला, रणजितराजे भोसले, निलेश काटे, अश्रफ मन्सुरी, वसिफ अक्रम अन्सारी, अॅड.संतोष जाधव, गफ्फार अन्सारी, मुनाफ शेख, परवेज मन्सुरी, दिलीप मोहिते, वसीम मंत्री, तौसीफ खाटीक, सत्तार शाह, रौशन हाजी, अश्फाक शाह यांनी मोर्चाचे नियोजन केले. मोर्चादरम्यान विविध मागण्या करण्यात आल्या, अत्याचार्यांना पाठीशी घालून त्यांचे समर्थन करणार्या तथाकथीत राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांना भविष्यात कोणत्याही निवडणूकीत पात्र उमेदवार म्हणून घोषीत करु नये. समर्थन करणार्या मंत्री, खासदार, आमदार त्यांचे सध्यस्थितीतील अस्तित्वात असलेले पद तात्काळ रद्द करण्यात यावे, सोशल मीडिया, व्हॉट्स अॅप, फेसबुक, युट्युब वरील अश्लिलतापूर्ण व्हिडीओंवर तात्काळ बंदी आणावी, आदी मागण्या करण्यात आल्या.