कुंझर दुर्घटनेप्रकरणी अखेर मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल
चाळीसगाव- तालुक्यातील कुंझर येथे जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती मात्र यात काहीतरी घातपात झाल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केला होता तर या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आधी मयत विवाहितेवर दीरानेच अत्याचार केला व नंतर घटना उघडकीस येऊ नये यासाठी विवाहितेने फाशी लावल्याचा बनाव उघड झाला आहे. या प्रकरणी मयत विवाहितेची सासू व आजेसासूचाही सहभाग असल्याने तिघांविरुद्ध गुरुवारी मेहुणबारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचारानंतर केला फाशीचा बनाव
कुंझर येथील 26 वर्षीय विवाहितेचा पती सैन्यात असून ती कुंझर येथे सासू व दिरासह राहत होती. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. विवाहितेचा दीर प्रविण छगनदास बैरागी (वय 24) याने विवाहितेवर बलात्कार केल्याचे उघड झाले असून प्रविणची आई आणि विवाहितेची सासू भिलाबाई छगनदास बैरागी तिची सासू (मयत विवाहितेची आजेसासू) विमलबाई भिकन बैरागी यांनी तिचा गळा दाबून मारले. नंतर प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट करीत आहे.