अदानीच्या वीज बिलवाढी विरोधात झाले आंदोलन

0

साकीनाका परिसरातील रहिवाशांचा संताप

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अदानी वीज पुरवठा कंपनीच्या वाढीव वीज बिलामुळे मुंबई उपनगरातील ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. याच संतापाला वाट करून देत साकीनाका परिसरातील रहिवाशांनी अदानीच्या साकीनाका वीज केंद्रावर धडक मोर्चा काढला.मुंबई उपनगरातील वीज पुरवठ्याचा कारभार नुकताच रिलायन्सकडून अदानी इलेक्ट्रिसिटीकडे गेला आहे. यावेळी वीज आयोगाने 2018-19 या वर्षासाठी 0.24 टक्के एवढी किरकोळ वीज दरवाढ करावी याकरीता कंपनीला मंजुरी दिली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक ग्राहकाच्या वीज बिलात अंदाजे 50 ते 500 रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली.त्यामुळे उपनगरातील सर्वच रहिवाशांकडून याबाबत उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार साकीनाका विभागातील रहिवाशांनी विजेच्या वाढीव बिलाविरोधात रस्त्यावर उतरून अदानी वीज कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चौकशी सुरू

वाढीव वीज बिलाबाबत अदानी वीज कंपनीची शासनाने चौकशी सुरू केली असून अशा पद्धतीने होणारी लुटमार कदापि सहन केली जाणार नाही. असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले. त्याशिवाय जनतेचा कष्टाचा पैसा चुकीच्या पद्धतीनं लुटण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याविरोधात जनता आंदोलन करणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अचूक मीटर रिडिंग हवी

अदानी वीज कंपनीने आपले सर्व व्यवहार पारदर्शक करत एकूण खर्च आणि एकूण नफा याचा ताळेबंद संकेतस्थळावर अपलोड केल्यास सर्वसामान्य जनतेला वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती समजेल. तसेच प्रत्येकाला स्वतंत्र वीज मीटर आणि प्रत्येक महिन्याला ग्राहकांच्या मीटरची अचूक रिडिंग करण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली