अधिकारी व एजंटमध्ये समन्वय ठेवा

0

धुळे । प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओच्या कारभाराचा दाहक अनुभव सर्वसामान्य वाहनधारकांना गाडी पासिंग करताना तसेच वाहन परवाना काढताना येतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधारक एजंटांकडे जातो; मात्र आरटीओतील अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे कामेच होत नाहीत. एखाद्या एजंटांने नियमावर बोट ठेवून काम करायला सांगितले तर बाहरे गुंडांच्या मार्फत एजंटांना त्रास दिला जातो, असा गंभीर आरोप एजंटांकडून केला जात आहे. त्यामुळे मंगळवारी राष्ट्रवादीने आरटीओ अधिकार्‍यांना घेराव घातला. अधिकार्‍यांच्या कारभाराचा पाढा वाचला. एजंट आणि अधिकारी यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न व्हावेत, त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांची कामे लवकर होतील, अशी सूचना यावेळी धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केली. त्यांच्या सुचनेची दखल घेऊन अधिकारी आणि एजंटांनी मार्ग काढला.

जनतेची कामे खोळंबली
प्रादेशिक परिवहन खात्यात गेल्या काही दिवसांपासून अधिकारी आणि एजंटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे जनतेची कामे होत नव्हती. वाहनधारकांची कामे लवकरात लवकर करण्यासाठी एजंट अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करीत होते. मात्र, काही अधिकारी छोट्या-छोट्या कामासाठी अडवणूक करीत होते. त्यामुळे जनतेची कामे खोळंबली होती.

आरसीबुक, लायसन्स पेंडींग
एखाद्या एजंटाने जाब विचारला तर त्यांना गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास दिला जात होता. अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे जवळपास 3 ते 4 हजार आरसी बुक आणि लायसन्स पेंडीग आहेत. ऑनलाईन कामेदेखील वेळेवर होत नाहीत. कागदोपत्री त्रुटी असल्यास वाहनधारकाला माहिती मिळायला सहा ते आठ दिवस लागतात. वाहन निरीक्षकांच्या मनमानी कारभारामुळे चांगल्या गाड्यांनाही फेल केले जाते. लायसन्ससाठी वाहनांची ट्रायल चुकीच्या पद्धतीने घेतली जाते. नवीन वाहनांची पासिंग होवून सात-सात दिवस अधिकारी संगणकावर अ‍ॅप्रुव्हल देत नाहीत. त्यामुळे वाहनधारकाला दोन टक्के दंड भरावा लागतो. सविस्तर पत्ता दिल्यानंतरदेखील वाहनधारकाला महिनाभरानंतर लायसन्स त्याच्या घरी पोहचते होत नाही. या भोंगळ कारभारामुळे आरटीओतील काही एजंटांनी राष्ट्रवादीचे नेते माजी आ. राजवर्धन कदमबांडे आणि जिल्हाध्यक्ष मनाजे मोरे यांच्याकडे समस्या मांडल्या.

यांचा चर्चेंत सहभाग
मनोज मोरे, उपप्रादेशिक अधिकारी जे. जे. पवार, अविनाश राऊत, सहाय्यक परिवहन अधिकारी किरण मोरे, अतुल चव्हाण, संजय वाल्हे, बाळू आगलावे, रजनिश निंबाळकर, मिलिंद बैसाणे, सुनील चौधरी, राजेंद्र मोमाया, बाबूशेठ बायदवाले, किसन भारस्कर, विजय खैरनार, प्रभाकर सपकाळ, रमेश जोशी, रवी कोठावदे, हेमंत लगाडे. सुहास शिर्के, नरशे देवरे, भगवान चौधरी, महेंद्र साळवे आदी उपस्थित होत.