अधिकारी स्मिता झगडेंना संतप्त नगरसेविकांनी झापले

0

फ्लेक्सची तक्रार करणार्‍याचे नाव ठेवले नाही गोपनीय

पिंपरी-चिंचवड : अनधिकृत फ्लेक्सबाबत तक्रार करणार्‍या नगरसेविकेचे नाव उघड करणार्‍या प्रभाग अधिकारी स्मिता झगडे यांना स्थायी समिती सभेत नगरसेविकांनी धारेवर धरले. नगरसेविकांचे आक्रमक रुप पाहून आयुक्तांनी झगडे यांना समज दिली.

सभेमध्ये स्थायी समिती सदस्या उषा मुंढे यांनी शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीकडे लक्ष वेधले. त्यांच्या पिंपळे गुरव प्रभागातील पदपथावर असलेल्या एका संघटनेच्या अनधिकृत फ्लेक्सबाबत त्यांनी झगडे यांच्याकडे तक्रार केली होती. झगडे यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत त्यावर कारवाई देखील केली. मात्र, कारवाईबाबत संबंधित संघटनेचे पदाधिकारी जाब विचारायला आल्यानंतर त्यांनी मुंढे यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई केल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मुंढे यांचे कार्यालय गाठून गोंधळ घातल्याची व्यथा मुंढे यांनी भर स्थायी समिती सभेत मांडली.

आंदोलनकर्त्यांच्या दबावातून नाव उघड
अनधिकृत फ्लेक्सबाबत तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवणे प्रशासनाला बंधनकारक असताना अधिकारी नगरसेवकांचे नाव तक्रारदारांसमोर उघड करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल मुंढे यांनी केला. यावर झगडे यांनी खुलासा करताना संबंधित संघटनेचे पदाधिकारी प्रभाग कार्यालयात दोन-तीन तास ठिय्या मांडून होते. त्यांच्याकडून फ्लेक्सवर कारवाई करणार्‍या कर्मचार्‍यांना मारहाण होण्याची भिती होती. त्यामुळे आपण मुंढे यांचे तोंडी नाव सांगितले. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी झगडे यांना समज दिली. अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणे ही प्रशासकीय जबाबदारी आहे. फ्लेक्स काढला म्हणून कोणी धमकावत असेल तर आयुक्त म्हणून थेट आपल्याशी संपर्क साधावा, सदस्यांना विश्‍वासात घ्यावे. भविष्यात असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करावी लागेल.

आयुक्तांची भूमिका दुतोंडी
दरम्यान, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या पालिकेतील कार्यालयातील संगणक प्रशासनाने काढून नेला होता. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्षांनी सांगितल्यामुळे संगणक काढून घेतला असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले होते. त्यानंतर मात्र त्यांनी घुमजाव देखील केला होता. त्यावेळी देखील आयुक्तांना कोणी तरी समज देणे गरजेचे होते.