धुळे (प्रतिनिधी)- शासनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी शेतकर्यांची जमिन अधिग्रहण करतांना शासनातील अधिकारी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारुन आपल्या दलालांमार्फत अक्षरश: लूट करीत असतात. विखरणच्या धर्मा पाटील यांच्या प्रकरणामुळे जमिन अधिग्रहण कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पडदा फार्श झाला आहे. धर्मा पाटील यांनी विष प्राशन करुन गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. जमिन अधिग्रहण कार्यालयाच्या बाहेर आणि कार्यालयात सुध्दा दलालांचा सुळसुळाट झाला असून दलालांच्या मध्यस्थीशिवाय आलेल्या प्रामाणिक शेतकर्याला दाद मिळत नसल्याचा आरोप आ. अनिल गोटे यांनी केला आहे.
दलाली न दिल्याने शेतकर्यास कमी मोबदला
दलाली करणारे राजकीय पक्षाचेच कार्यकर्ते असून एकदा या सर्वांचे मुखवटे फाडून खरे चेहरे जनतेसमोर आलेच पाहिजेत. धर्मा पाटील, वय वर्षे – ८४ या वयोवृध्द शेतकर्यांची बागायत जमिन व अंब्याची ४०० झाडे असतांना तसेच ७/१२ उतार्यावर त्याची नोंद असताना त्या बिचार्या शेतकर्यास २ लक्ष १८ हजार रुपये नुकसान भरपाई दिली आणि त्याच्याच बांधालगत असणार्या शेतकर्याला मात्र १ कोटी ९० लाख रुपये भरपाई देणे खरोखरच अनाकलनीय आहे. वरचे ९० लाख रुपये दलाल खावून गेले आणि धर्मा पाटलाने मात्र मध्यस्थी दलाल नेमला नसल्यामुळे त्याच्या पदरी निराशा आल्याने त्या नैराश्येतून त्याला मंत्रालयातच विष प्राशन करावे लागले. युती शासनाला बदनाम करण्याचे हे कारस्थान मुख्यमंत्र्यांनी मोडून काढले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यात आपपरभाव न करता जे दोषी असतील त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा याच अधिकार्यांनी अधिचे सरकार घालविले, आता हेच अधिकारी आपले सरकार घालविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार अनिल गोटे यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे. सदर प्रकरणी आपण येत्या अधिवेशनात हा विषय विधीमंडळात उपस्थित करुन धर्मा पाटील या अन्यायग्रस्त शेतकर्यास न्याय मिळवून देवू, असेही शेवटी पत्रकात त्यांनी म्हटले आहे.