कँन्टोन्मेंट बोर्डाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
खडकी : प्रतिनिधीलाचखोरी प्रकरणी निलंबित केलेले खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य व उद्यान अधिक्षक नाईक यांना सेवेत रुजु करुण घेण्यासाठी कँन्टोन्मेंट प्रशासन दिरंगाई करित असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी नाईक कुटुंबिया समेवत प्राणांतिक उपोषणास बसले होते. आठ दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल असे कँन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर नाईक यांनी आपले उपोषण मागे घेतले. लाचखोरी प्रकरणी कँन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य व उद्यान अधिक्षक नाईक यांच्यावर 2005 मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्या नंतर मुंबई उच्च न्यायालयाने 6 आक्टोबर 2016 रोजी नाईक यांची सर्व प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने मुक्तता केल्याने आपणांस सेवेत पुन्हा रुजु करुण घ्यावे अशी लेखी मागणी नाईक यांनी बोर्ड प्रशासनाकडे वारंवार केली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
उपाध्यक्षांनी विषय लावून धरला
कँन्टोन्मेंट उपाध्यक्ष अभय सावंत, सदस्य सुरेश कांबळे, कमलेस चासकर व दुर्योधन भापकर यांनी नोव्हेंबर 2017 बोर्ड सभेत नाईक यांची पुर्व पदावर नियुक्ती केली जावी या करिता बोर्ड सभेत विषय लावुन धरला होता. बोर्ड प्रशासनाने ही एक समिती नेमुन महिनाभरात या प्रकरणी निर्णय घेतला जाईल असे सदस्यांना बोर्ड सभेत आश्वासन दिले होते. बोर्ड प्रशासन दिरंगाई व टाळाटाळ करित असल्याने त्रस्त झालेले नाईक यांनी गुरुवारी सकाळी संपुर्ण कुटुंबियांसमवेत कँन्टोन्मेंट प्रवेशद्वारा शेजारी प्राणांतिक उपोषनाचे अस्त्र उगारले. महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व खडकी कँन्टोन्मेंट कामगार संघर्ष सेनेने या आंदोलनास पाठिंबा देत नाईक यांना तातडीने सेवेत रुजु करुण घेण्याची मागणी केली.