पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो त्यास 365 दिवस, 5 तास 48 मिनिटे आणि साडे 47 सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले 12 हिंदू चांद्र मास मात्र 354 दिवसांतच म्हणजे 11 दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमावस्येला संपणारे असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करत नाही, रास बदलत नाही तो अधिक मास समजल्या जातो. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा 33 दिवसांचा फरक अधिक मास टाकून ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल, तर म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर त्यावेळी त्यास अधिक मास असे नाव देण्यात आले. ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना असे मानतात. हिंदू पंचांगातल्या प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादश्या असतात; त्यांतल्या 24 एकादशींपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. मात्र, अधिक महिन्यात येणार्या दोनही एकादशांना ’कमला एकादशी’ हेच नाव असते. दोन अधिक मासांत जास्तीत जास्त 35 महिन्यांचे आणि कमीत कमी 27 महिन्यांचे अंतर असते. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीही अधिक महिने असत नाहीत. अधिक मास जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांतच येतो. त्या महिन्यांत सूर्याची गती किंचित मंद असते. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. एखाद्या ज्येष्ठ महिन्यात अधिक मास आल्यास 19 वर्षांनी परत तो ज्येष्ठ महिन्यातच येतो. चैत्रपासून अश्विनपर्यंतच्या 7 मासांपैकीच एखादा अधिक मास असतो. कारण या काळात सूर्याची गति मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसर्या राशीत जाण्यास 30 दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिकमास पुन्हा 19 वर्षांनी येतो. अधिक महिना हा विष्णूचा महिना मानण्यात आल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. त्याचसोबत मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात.
याबाबतीत एक कथा अशी ही सांगितली जाते की हिरण्यकश्यपूला बारा महिन्यात कधीच मरणार नाहीस असे वरदान मिळाले होते. त्यामुळे त्याला मारण्यासाठी हा अधिक मास विष्णूने निर्माण केला होता. नरसिंह अवतार घेऊन विष्णूने हिरण्यकश्यपूला संपवले होते. त्यामुळे साहजिकच हा मास त्यांच्या स्तवनाचा आहे. विष्णूचा जप या महिन्यात करावा. या जपाने नक्कीच मुक्ती मिळू शकते, अशी लोकांची धारणा आहे. म्हणूनच या महिन्यात विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजाअर्चा करतात, तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदींमुळे सुखशांती, संसारसुख मिळते.
धोंड्याचा महिना – अधिक मासला धोंड्याचा महिना म्हणून सर्वजण ओळखतात. हिंदू धर्मानुसार लेक आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला दान दिल्या जातो. अनारशाऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक किंवा त्यासारखे जाळीदार पदार्थ देण्याची प्रथा आहे. या महिन्यात नारळ, सुपार्या, फळे यांसारख्या वस्तूसुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात. या महिन्यात पुरणाचे धोंडे करून आमरसासह इष्ट मित्रांना, नातेवाइकांना भोजन देतात. यावरूनच या महिन्यास ’धोंडे महिनासुद्धा म्हणतात. हा महिना पुण्यप्रद समजला जातो. या महिन्यात केलेली धर्मकृत्ये, दान, जप इत्यादी अधिक पुण्यप्रद आहेत, असे समजले जाते. या महिन्यात जावयाला विष्णूच्या जागी मानून त्याचा आदर करण्याची प्रथा आहे.
– नागोराव सा. येवतीकर
सामाजिक कार्यकर्ते ता. धर्माबाद
9423625769