अधिवेशनासाठी मुंबईतील लोकप्रतिनिधींची मातोश्रीवर परेड

0

मुंबई:- गुरुवारी झालेल्या जिल्हा आणि विभागप्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेनेने अधिवेशनासाठी जोरात तयारी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. आज, शुक्रवारी शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवक, आमदार, खासदारांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनात मांडायचे राज्यातील प्रश्न तसेच मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींना अधिवेशनात मांडण्यासाठी विविध समस्यांची माहिती संकलित करन्याचे आदेश ठाकरे यांनी दिले.

सत्तेत सहकारी असून देखील भाजपला कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने काल झालेल्या बैठकीत बँकांमध्ये नोटीस लावून ढोल वाजविण्याचे आंदोलन राज्यभर केले जाणार आहे, या पार्शभूमीवर या बैठकीकडे लक्ष लागून होते. या बैठकीला मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफी विषयावर आजच्या बैठकीत देखील दीर्घकाळ चर्चा केली. यावेळी देखील बँकांच्या कामकाजाकडे लक्ष ठेवून राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच जकातनाके बंद झाल्यामुळे मुंबईची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असून तपासणीसाठी व्यवस्था करण्यासंबंधी चर्चा केली.

ढोल वाजवण्याचे आंदोलन हे बहिऱ्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी आहे. बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींना माहिती संकलित करण्याबाबत तसेच शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नयेत यासाठी लक्ष देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
आ. नीलम गोऱ्हे
शिवसेना नेत्या.