राजगुरुनगर । आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकींच्या तयारीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षपदी रुपाली परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या संगीता जगताप यांच्या हस्ते परदेशी यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून खेड तालुका महिला अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू होती. त्यानुसार अखेरीस या पदासाठी प्रबळ दावेदार असणार्या रुपाली परदेशी यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील महिलांचे संघटन करून भाजप मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे रुपाली परदेशी यांनी सांगितले. याप्रसंगी राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सारिका इंगळे, मोहिनी राक्षे, चांगदेव शिवेंकर, दत्ता मांडेकर, शिवाजी डावरे, राजेंद्र जगताप, सचिन लांडगे, रोहित परदेशी, अभिजित सांडभोर आदी उपस्थित होते.