विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात विरोधक आक्रमक
मनमानी व पक्षपाती कारभार असल्याने दावरून दूर करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल
मुंबई: – विधानसभा अध्यक्ष सदन चालवताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहेत. या संपूर्ण प्रकरणी विरोधकांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर चर्चाच होऊन द्यायची नाही ही सरकारची भूमिका असून अध्यक्ष हे सदनाचे नसून सरकारचे आहेत अशी भूमिका घेत असल्याचा आरोप करत मनमानी, पक्षपाती धोरणाविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करत असल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्र परिषदेत दिली. यावेळी विधिमंडळ गटनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील उपस्थित होते. विरोधी पक्षाने सोमवारी हरिभाऊ बागडेंविरोधात अविश्वासाचा प्रस्तावही दाखल केला आहे. त्यामुळे आता यापुढे विरोधी पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अध्यक्षांचे मनमानी आणि पक्षपाती धोरण- विखे पाटील
गेले दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचे कामकाज होऊ दिले जात नाही. सरकार विरोधी पक्षाच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. राज्यपालांच्या अभिभाषणवर उत्तरही न देता विधानसभा अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकले. ही घटनेची पायमल्ली आहे. सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. अशी सरकारची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायचे ठरवले आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. उत्तरे मिळत नाहीत म्हणून अनेकदा विरोधी पक्षाकडून कामकाज रोखून धरले जाते, मात्र गेले दोन दिवास सत्ताधारी पक्षाकडून काम चालू दिले जात नाही. सभागृह सार्वभौम आहे. काम सुरळीत चालविण्याची जबाबदारी अध्यक्षांची असते मात्र दुर्दैवाने महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या अभिव्यक्तीचे संरक्षण करण्याऐवजी पायमल्ली करण्याचे काम अध्यक्षांकडून होतेय. त्यांचे काम न्याय देण्याचे आहे त्याचे त्यांनी भान ठेवावे असे विखे पाटील म्हणाले. अध्यक्षांच्या मनमानी, पक्षपाती धोरणाविरोधात आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून त्यांना अध्यक्ष पदावरून दूर करण्यात यावे असा प्रस्ताव असल्याचे विखे पाटील म्हणाले.
सरकारची उत्तरे देण्याची मानसिकता नाही:- अजित पवार
धनंजय मुंडे यांच्या कथित ऑडियो क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमण्याचे सांगितले. खुद्द मुंडे यांनी तक्रार केली आहे. चौकशीसाठी आमची तयारी आहे असे सांगत कामकाज सुरु करावे असे आम्ही म्हटले. मात्र राज्यपालांच्या अभिभाषणावर आम्हाला बोलायचे होते तर प्रस्ताव गोंधळात पारित करून सभागृह बंद केले गेले. मुख्यमंत्री मत मांडत असताना सत्ताधारी मागे घोषणा देतात. मुख्यमंत्र्यांनी सांगितले असते तर सगळे खाली बसले असते. सभागृह नेते सांगतात तेव्हा सगळे सदस्य खाली बसतात. परंतु सरकारची उत्तरे देण्याची मानसिकता नाही, असा आरोप अजित पवार यांनी केला. भोंगळ कारभार चालला असून अध्यक्ष याला अप्रत्यक्ष साथ देत आहेत म्हणून अध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी अविश्वास दाखल केला आहे, असे पवार म्हणाले. सुट्ट्या खूप आहेत त्यामुळे आम्हाला काम करायला फार कमी दिवस असल्याचेही पवार म्हणाले.
अध्यक्ष पक्षपातीपणाने वागत आहेत – पृथ्वीराज चव्हाण
राज्यपालांच्या अभिभानावर आम्ही बोलणार होतो. विरोधाचा मुद्दा संपला असताना हाऊस बंद पाडले. सरकारने आपल्याला उत्तर द्यायला लागू नये म्हणून सरकाने पळ काढला. अचानक अध्यक्षांनी उद्योगमंत्र्यांना निवेदनाची परवानगी दिली. नानार प्रकल्पावर उद्योगमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्याची परवानगी दिली. मुख्यमंत्र्यांचा दबाव पडला आणि वेगळे निवेदन आले असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला. नियमबाह्य पद्धतीने राजकीय महत्वाचा विषय असल्याने निवेदन द्यायला लावले. अशी अनेक उदाहरणे आहेत. अध्यक्ष पक्षपातीपणाने वागत आहेत, त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव दिला असल्याचे चव्हाण म्हणाले. याशिवाय गोंधळातच राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा मंजूर करणे, पुरवणी मागण्यांवरही चर्चा न करताच त्याही मंजूर करणे यासह शेतकऱ्यांची प्रश्न, गृह विभाग, महसूल विभागासारख्या महत्वाच्या विभागांवरील चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र त्यावर चर्चाच होवू द्यायची नाही आणि घ्यायची नाही असा चंग बागडे यांनी बांधल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर कामकाज :- जयंत पाटील
जाणीवपूर्वक विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. अध्यक्षच आमच्या भाषणात अडथळे आणत आहेत, आणि उलट प्रश्न करतात असेही पाटील म्हणाले. अध्यक्षांवर अविश्वास दाखल करण्याची अनेक कारणे असून अविश्वासाचा ठराव आम्ही मांडला असल्याचे पाटील यांनी सांगितले. अध्यक्षांकडून दुजाभाव होतोय अध्यक्षांच्या कामकाजात सर्वांना सामान वागणूक नाही पोरकटपणा आणि सभागृहाची प्रतिष्ठा घालविण्याचे काम सुरू असल्याचे पाटील म्हणाले. सगळे कामकाज नियमबाह्य होत असून मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर कामकाज चालत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.