अध्ययन निष्पत्तीला अनुसरून हवी अध्ययन-अध्यापनाची रचना

0

डॉ. जगदीश पाटील : भुसावळला मराठी विषय माध्यमिक शिक्षकांचा उद्बोधन वर्ग

भुसावळ – राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार अध्ययन निष्पत्तीला अनुसरून अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे तसेच मूल्यमापनाची प्रक्रिया देखील अध्ययन निष्पत्तीवरच आधारित आहे. त्यामुळे शिक्षकांनी अध्ययन-अध्यापनाची रचना अध्ययन निष्पत्तीला अनुसरूनच करावी, असे आवाहन बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी येथे केले. शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये आयोजित मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्यातील इयत्ता पाचवी ते दहावीला शिकवणार्‍या मराठी विषय शिक्षकांच्या उद्बोधन वर्गात तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विषयतज्ञ महेंद्र नाईक, मुख्याध्यापक लालचंद सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक सुरेश पाटील उपस्थित होते. उद्बोधन वर्गासाठी डीआयईसीपीडीचे अधिव्याख्याता प्रा.शैलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, भुसावळ गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ संजय गायकवाड, मुक्ताईनगर गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ महेंद्र मालवेकर, भगवान कांबळे यांनी परीश्रम घेतले.

अध्ययन निष्पत्तीला अनुसरून अध्ययन अध्यापन करावे
डॉ.जगदीश पाटील यांनी आपल्या उद्बोधनात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, शालेय शिक्षण गुणवत्ता सूचक व शिक्षणाच्या वार्षिक स्थितीचा अहवाल यासंदर्भात आपण कसे मागे पडलो आहे आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा कार्यक्रम पिसा याला कसे सामोरे जायचे आहे यासाठी आवश्यक असलेली उद्बोधनाची गरज सांगितली. तसेच भाषा विषयक अध्ययन निष्पत्तीचे स्वरूप व वैशिष्ट्ये इयत्तानिहाय सांगून भाषेच्या परिणामकारक वापराचे अपेक्षित टप्पे उदाहरणासह पटवून दिले. पाठ समजून देण्यासाठी न शिकवता पाठ शिकवण्याच्या निमित्ताने भाषेच्या परीणामकारक वापराच्या संधी दिल्या पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला भाषेचे उत्तमोत्तम अनुभव मिळून त्याला विचार करण्याची संधी मिळेल आणि अभिव्यक्त होण्यासाठी मुक्त वातावरण निर्माण होईल. अध्ययन निष्पत्तीला अनुसरून अध्ययन अध्यापन करताना स्वमत, अभिव्यक्ती, ज्ञानरचनावाद, डिजीटल, कृतियुक्त अध्यापन पद्धती यांचा वापरही शिक्षकांनी कौशल्याने करून घ्यावा, असे आवाहन डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या उद्बोधनात केले. विषयतज्ञ महेंद्र नाईक यांनी पहिल्या सत्रात सद्यस्थितीचे विश्लेषण मांडले. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार पडलेल्या या उद्बोधन वर्गात मुक्ताईनगर तालुक्यातील 50 तर भुसावळ तालुक्यातील 80 शिक्षक उपस्थित होते.