शहापूर । शहापूरातील आध्यात्मिक विद्या प्रचारक संस्था (रजि.) शहापूर या संस्थेच्या वतीने दरवर्षी, संस्थापक अध्यक्ष हभप भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाने अध्यात्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक सेवा या क्षेत्रात विविध उपक्रम शहापूरसह राज्यात व परदेशातदेखील सातत्याने राबिवण्यात
येत आहेत.
त्यानुसार सुदृढ मनाच्या व समाजाच्या निर्मिती बरोबरच सुदृढ शरीरासाठी शहापुरकरांना एक अविरत सेवा मिळावी म्हणून सप्ताहातून एकदा मोफत वैद्यकीय चिकित्सा व औषधोपचार केंद्र सावंत मैदान, चेरपोली शहापूर येथे सुरु करण्यात आले आहे. या आरोग्यसेवा केंद्राचे उदघाटन, आध्यात्मिक गुरू स्वामी अवधूतानंद, एकनाथ मंदिराचे सुभाषमामा दीक्षित यांच्या शुभहस्ते झाले.
नियोजित दिवशी सेवा
या मोफत आरोग्य तपासणी शिबीरासाठी अनिल हॉस्पिटल डोंबिवलीचे डॉ. अनिल हेरूर (कॅन्सरतज्ञ),डॉ.अनघा हेरूर (नेत्रतज्ज्ञ,) डॉ. आमित गर्ग (हृदयरोग तज्ज्ञ) अशा नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांची उपस्थिती होती. ही सेवा गरजू नागरिकांना उदघाटनदिनी लाभली व भविष्यातही मिळणार आहे. तसेच शहापूरचे उद्योगपती आकाश सावंत यांनी सेवा केंद्रासाठी कायमस्वरूपी जागा व औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. कॅन्सर, अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, दंतरोग, बालरोग या आजारांनी ग्रस्त रुग्णांना दरमहातून एकदा सप्ताहातील नियोजित दिवशी सेवा मिळणार आहे.तरी गरीब गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.