अध्यात्म हे ज्ञान क्षेत्र आहे तर धार्मिक हे कर्मकांड क्षेत्र : रमेश वाकणीस

0

मधुश्री व्याख्यानमालेत ‘शोधा म्हणजे सापडेल’ या विषयावर पहिले पुष्प

निगडी : विश्‍वाची निर्मिती कशी झाली याचे रहस्य उलगडण्याच्या प्रयत्न ऋषीमुनींनी केला आहे. वैज्ञानिक अजून या गोष्टीचा शोध घेत आहेत. अध्यात्म हे ज्ञान क्षेत्र आहे धार्मिक हे कर्मकांड क्षेत्र आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकणीस यांनी येथे व्यक्त केले. निगडी येथे विदर्भ सहयोग मंडळाच्यावतीने मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन दि. 25 ते 27 मे या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवसीय चालणार्‍या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘शोधा म्हणजे सापडेल’ या विषयावर रमेश वाकणीस यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र कुलकर्णी, मधुश्री कलाविष्कारच्या अध्यक्षा माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलिम शिकलगार, राजेंद्र घावटे, सुभाष चव्हाण, अरविंद वाडकर, शोभा जोशी, अंतरा देशपांडे, माधुरी विधाटे, नंदकुमार कांबळे, सविता इंगळे आदी उपस्थित होते.

ध्येय प्राप्त होईपर्यंत प्रयत्न करावे
‘शोधा म्हणजे सापडेल’ या विषयावर व्याख्यान देताना वाकणीस पुढे म्हणाले की, दैनंदिन व्यवहारात आपली एखादी वस्तू हरवली कि, आपण ती शोधतो आणि सापडली की आनंद व्यक्त करतो. आणि जर नाही सापडली तर त्याची उणीव भासते व कालांतराने त्याबद्दलची ओढ कमी होते. पण समजा आपण स्वतःचं हरवलो तर?…… अनेक वेळा ‘मी कोण आहे?’ असा अनेकांना प्रश्‍न पडतो. या एका प्रश्‍नासाठी अनेक लेखकांनी लिखाण केले आहे. जीवनाची जी साधना आहे कुणी त्याला आध्यात्मिक क्षेत्रात परमेश्‍वर प्राप्ती म्हणतात. आपण आजच्या युगात त्याचा असा अर्थ घेतो कि ती एक साधना आहे. एखादं ध्येय उराशी बाळगून ते प्राप्त होईपर्यत स्वस्थ बसायचं नाही. नेहमी प्रयत्नशील राहावं आणि प्रयत्न करत असताना वेगवेगळ्या संघर्षांना तोंड द्यावं लागतं. आणि यासाठी त्याची आत्मिक तयारी म्हणजेच मानसिक सामर्थ्य त्याने निर्माण केले पाहिजे. असे सांगून श्रीमद् गुरुचरिञातील अनेक कथा सांगून त्याचे दाखले दिले.

संस्थेतर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम
आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अनुराधा गोरखे म्हणाल्या की, या संस्थेमार्फत अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवले जातात आणि यापुढेही त्यांनी अश्याच प्रकारचे उपक्रम राबवावेत त्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितेंद्र कुलकर्णी म्हणाले की, आपण ठरलेले मजले चढत जातो पण त्याची किल्ली मात्र खालीच राहते. आज नक्कीच वाकणीस यांच्या व्याख्यानातून आपल्या हवे असलेली गोष्ट सापडेल अशी आशा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी ओक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला केळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनात राज अहेरराव, राधिका बोर्लिकर, अजित देशपांडे, नीता वैद्य आदींचे सहकार्य लाभले.